जळगाव : शरद पवार यांचा नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेला नाही अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली आहे


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या 20 आणि 21 रोजी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या या दौऱ्यामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात मोठं उत्साहाचं वातावरण पसरले होते. मात्र शरद पवार हे उत्तर महाराष्ट्र च्या दौऱ्यावर आले तर मोठी गर्दी होण्याची शक्यता होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणे हे अडचणीच ठरू शकणार असल्याने शरद पवार यांच्या या दौऱ्याला प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने शरद पवार यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. तो रद्द करण्यात आलेला नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.


भाजप नेते प्रसाद लाड यांनी नुकतंच एक विधान केले होते की, खडसे हे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला कोणताही फरक पडणार नसल्याचं म्हटलं होतं. लाड यांच्या या विधानाला प्रत्यत्तर देतांना खडसे यांनी म्हटलं आहे की, जनतेमधून मी सहा वेळा निवडून आलो आहे. लाड यांनी एकवेळ तरी जनतेतून निवडून दाखवावे. माझ्या जाण्याने भाजपला जर कोणताच परिणाम होणार नसेल तर भाजपचे नेते माझं नाव घेऊन तो फरक पडणार नसल्याचं वारंवार का सांगत आहेत. फरक पडणार असल्यामुळेच ते अशा प्रकारचं विधान करीत असल्याच ही खडसे यांनी म्हटलं आहे.


खडसेंना विधानपरिषदेचं सदस्यत्व


40 वर्ष भाजपमध्ये काम करुन विविध पदांवर काम केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत भाजपला सोडचिठ्ठी दिली. शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील महिन्यात प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश करताना कुठल्याही अपेक्षेशिवाय प्रवेश केला असल्याचं सांगणाऱ्या खडसे यांचं नाव राष्ट्रवादीने राज्यपाल नामनियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी देत त्यांचा 'सन्मान' केला असल्याचं बोललं जात आहे.