सातारा: राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. आता जागावाटप, मतदारसंघ, उमेदवार चाचपणी यांना वेग आला आहे. अशातच महाविकास आघाडी आणि महायुती आपल्या जागावाटपाबाबत सातत्याने चर्चा करत आहेत. काही जागांचा तिढा सुटला आहे, तर काही जागांवर अद्याप चर्चा सुरू आहेत अशी माहिती सातत्याने समोर येते. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीतील पक्षांसोबत आज बैठक आहे. त्या बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहणार आहेत. त्यानंतर आज निर्णय घेवून संध्याकाळपर्यंत सांगतील असंही शरद पवार म्हणालेत. शरद पवार यांनी यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभेसाठी जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील. जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष आहेत, कालच बोलताना शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल असं म्हटलं होतं.


एकीकडे शरद पवारांनी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देणार आहे, ते पक्षाचे अध्यक्षच आहेत, साताऱ्यातील जागांचा निर्णय सांगता येणार नाही याचा निर्णय जयंत पाटील घेतील असंही म्हटलं आहे. तर दुसरीकडे काल(बुधवारी) वाळव्याचा माणूस वर्षावर जावा पण पावसाच्या रुपानं वर्षाचं वाळव्यात आली. नियतीच्या मनात आहे. त्यामुळं तुम्हाला ताकद लावावी लागेल असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी इस्लामपूरात राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभेत केलं,त्यानंतर आता जयंत पाटलांवर आणखी कोणती मोठी जबाबदारी पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


शरद पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया


शरद पवार तुमच्यावर मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगत आहेत याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, माझ्यावर मोठी जबाबदारी आहेच. जास्तीत जास्त विधानसभेला जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे. किती जागा मागितल्या या प्रश्नावर, तुम्हाला सांगण्यापेक्षा मित्र पक्षांना सांगतो असं ते म्हणालेत. बाहेरच्या पक्षातील लोकांना घेण्याचा आमचा उद्देश नाही. आमच्याकडे तरुण चेहरे आहेत. मुख्यमंत्री चेहरा जाहीर करावा असं उध्दव ठाकरे यांचा आग्रह आहे पण याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे, असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. 


बबनदादांच्या भेटीवर शरद पवारांची प्रतिक्रिया


माढ्याचे आमदार बबनदादा भेटणार आहेत, दोनवेळा भेट झाली याबद्दलच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, ‘भेटायला कोणी आलं, तर काय करणार. राजकारणामुळे व्यक्तीगत सलोखा संपत नाही’.