Sharad Pawar on Ajit Pawar : शरद पवार यांनी उप मुख्यमंत्री अजित पवारांना आपल्या खास शैलीत उत्तर दिलेय. यांना थांबा म्हटलं तर थांबले नाहीत, कुणी 38 व्या वर्षी निर्णय घेतला तर मी 60 व्या वर्षी निर्णय घेतला, असे अजित पवार म्हणाले. नव्या लोकांना प्रोत्साहन द्यायची काळजी मी घेतली, याचाच मला आनंद आहे, असे शरद पवारांनी म्हटलेय. पुण्यातील भीमथडी जत्रेमध्ये शरद पवारांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. जत्रेतील विविध स्टॉल्सचा शरद पवारांकडून आढावा घेण्यात आला.
शरद पवार काय म्हणाले ?
अजित पवार म्हणाले ते खरं आहे, माझं सगळीकडे लक्ष नव्हतं. तिथली जबाबदारी कुणी घ्यावी, तिथल्या लोकांनी ठरवावे. सगळ्यांना सोबत घेऊन काम करावे, हीच भूमिका राहिली. नव्या लोकांना प्रोत्साहन द्यायची काळजी मी घेतली, याचाच मला आनंद आहे.
मागील 10 ते 15 वर्ष झालं बारामतीत मी लक्ष घातलं नाही. मी कधीच तिथं कोणता निर्णय घेतला नाही. नवीन पिढी पुढे येऊन त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, असं मला वाटतं. आता तिथल्या त्यांनी सगळ्यांना बरोबर घ्यावं, नावलौकीक वाढेल असे निर्णय घ्यावेत.
तुमच्या बंडात आणि अजित पवारांच्या बंडात काय फरक? यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "आमच्या काळात बंड नव्हतं. आम्ही बसून निर्णय घ्यायचो. यात कुठलीच तक्रार नसायाची. आज कुणी काय केलं असेल, त्याच्याही तक्रार करायची कारण नाही. फक्त पक्ष महत्वाचा आहे. त्याचा संस्थापक कोण राहिलेय? लोकांनी या पक्षाला मोठं केलं. या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोरच आहेत. त्यामुळे त्याच्यावर अधिक काही भाष्य करण्याची गरज नाही."
अजित पवार काय म्हणाले होते ?
कुणी 38 व्या वर्षी बंड केले, आम्ही साठीमध्ये वेगळी चूल मांडली. आता तुम्ही थांबा.. आम्हाला काम करु द्या, अशी वारंवार विनंती करत होतो, आता कार्यकर्त्यांनी माझं ऐकावं. महत्वाचे नेते माझ्यासोबत आहेत, असे अजित पवार रविवारी बारामतीमधील कार्यक्रमात म्हणाले होते.
अजित पवारांना शेलक्या शब्दात उत्तर -
मी स्वत संसदीय काम करतो. म्हणजे मला त्यांचे निर्णय माहितच नसतात. उद्या त्यांच्या संसदीय कामात मी लक्ष देईन का? आणि सतत आमच्यामध्ये चर्चा असते. त्या जागेबद्दल काही व्यक्तिगत अडचणी असू शकतात, त्याची चर्चा होते. पण अन्य कुठल्या बाबतीतील वाद त्यांनी कधी माझ्या कानावर घातला नाही, जो घातला जो, मतदार संघाच्या कामांसबंधित होता, असे शरद पवार म्हणाले. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडणार, असा निर्धार केला. त्याबाबत शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केले. प्रत्येकाचा जो-तो अधिकार आहे, प्रत्येक राजकिय व्यक्तीचा तो अधिकार आहे. त्यांचे उमेदवार निवडायचे बदलायचे, काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यावर भाष्य करण्याचं काही कारण नाही, असेही शरद पवार म्हणाले.