अहमदनगर: कोपर्डी घटनेतील पीडितेच्या कुटुबीयांची आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत, न्यायालयीन प्रक्रियेवर ताशेरे ओढले. न्यायालयीन प्रक्रिया लांबल्यानेच गुन्हेगारी वाढली असल्याचे मत पवारांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
पवार म्हणाले की, ''कोपर्डीसारख्या अमानवी घटना रोखण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया तातडीनं पुर्ण करायला हवी. दिल्लीतील घटनेनंतर जसा खटला जलदगतीने चालला, तसेच याही घटनेचा निवाडा जलदगती न्यायालयात व्हायला हवा. तरच गुन्हेगारांना चाप बसेल.''
यावेळी त्यांनी कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्यांवरही अक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, ''काही लोक कायद्याबद्दल बोलत आहेत. परंतु कायदा बदलणे, हे काही एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या हातात नाही. त्यासाठी संसदेमध्ये चर्चा व्हावी लागते, त्यावर एकमत व्हाव लागतं. समोरच्या बाजूचं म्हणणं एकून घ्यावं लागत.''
यावेळी त्यांनी कोपर्डी ग्रामस्थांचेही कौतुक केले. ''या गावाने दाखवलेला संयम कौतुकास्पद आहे, अभिनंदनीय आहे. काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांना या गावात येण्यास मनाई करण्यात आली असे सांगण्यात आलं. परंतु, मला तरी येथे येण्यास कोणाचाही विरोध झाला नाही.''