N D Mahanor Passes Away : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) रुग्णालयात वयाच्या 81 व्या वर्षी आज (3 ऑगस्ट) सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर औरंगाबादच्या उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, यावर अनेक प्रतिकिया येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील ट्वीट करत ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली असून, दुःख व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे ना. धों. महानोर आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबध होते.
शरद पवारांचे ट्वीट...
शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले, पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.”, असे पवार म्हणाले.
सुप्रिया सुळेंनी वाहिली श्रद्धांजली
दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्वीट करत ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. हि आम्हा सर्वांसाठी व्यक्तिगत हानी आहे. महानोरांनी खऱ्या अर्थाने मराठी साहित्यात बालकवी आणि बहिणाबाई यांचा समृद्ध वारसा जीवंत ठेवला. कवितेतून माती, शेती आणि संस्कृतीची नवी ओळख करुन दिली. त्यांच्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी' ‘रानातल्या कवितां' आदी अनेक रचना अजरामर आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त म्हणून देखील काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे साहित्याला मातीशी जोडून ठेवणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला.या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण महानोर कुटुंबियांसोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली..." असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
N D Mahanor Passes Away : ज्येष्ठ कवी ना धों महानोर यांचं निधन, वयाच्या 81 व्या अखेरचा श्वास