मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ झाली आहे. यादरम्यान पडद्यामागे अनेक अशा घटना घडल्या, ज्याबद्दल महाराष्ट्रातील जनता अनभिज्ञ आहे. त्यापैकी काही गोष्टींचा खुलासा स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी केला आहे. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे शरद पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये पवारांनी राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात घडलेल्या अनेक गोष्टींवर भाष्य केले.


शिवसेनेने सुरुवातीला भाजपसोबतची तीस वर्षांपासूनची युती तोडली. त्यामुळे राज्यातला सर्वात मोठा पक्ष असूनही भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरला. तसे त्यांनी राज्यपालांना कळवले होते. त्यानंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार बनवण्याच्या तयारीत होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेतेदेखील त्यास अनुकूल होते. परंतु त्याचदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन भाजपला जाऊन मिळाले. अजित पवारांच्या पाठिंब्यावर भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला. 23 नोव्हेंबर रोजी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा राजकीय भूकंप पाहिल्यानंतर सर्वांना प्रश्न पडला होता की, अजित पवारंनी भाजपसोबत युती का केली?

या राजकीय भूकंपाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपसोबत हातमिळवणी करताना अजित पवारांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. अजित पवार फडणवीसांना म्हणाले होते की, आजच्या आज जर तुम्ही शपथ घेणार असाल, तर आम्ही हे सगळं करण्यास तयार आहोत.

दरम्यान यावेळी शरद पवार यांनी स्वतःची बाजू स्पष्ट करताना सांगितले की, लोकांना असे वाटते की, मला याची पूर्ण कल्पना असेल, किंवा अजित पवारांच्या या अशा कृतीला माझा पाठिंबा असेल. परंतु हे साफ चुकीचं आहे. मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती.

पवार म्हणाले की, सुरुवातीच्या वेळी मला अजित पवारांनी एकच गोष्ट सांगितली होती. अजित पवार एके दिवशी मला म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस काहीतरी बोलायचं म्हणतात. मी जाऊ का?" राजकारणात संवाद ठेवला पाहिजे, या भूमिकेतून मी अजित पवारांना फडणवीसांशी बोलण्यासाठी होकार दिला. परंतु दुसऱ्या दिवशी असं काही घडेल, याची मला कल्पना नव्हती.

शरद पवार यांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी शपथविधी पाहून मलाही आश्चर्य वाटलं होतं. परंतु त्या दिवशी मला एक गोष्ट समजली की, आपलं सरकार किती एफिशियंट आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल हे सगळे किती जोमाने काम करतात, हे पाहिलं. सकाळी सहा वाजता हे सगळं घडतंय, हे पाहून माझा विश्वासच बसत नव्हता.

शरद पवार म्हणाले की, शपथविधीला जे लोक उपस्थित होते त्यातले काही चेहरे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे लोक असे आहेत जे मी म्हणेन तेच करतील. हे माझे लोक आहेत. त्यामुळे हे जे काही घडलंय आणि घडतंय ते मी सुधारु शकतो, याचा मला विश्वास बसला.

वाचा : शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी सोनिया गांधींना 'या' गोष्टींची आठवण करुन दिली : शरद पवार

80 तास आणि शरद पवारांचा पॉवर प्ले! | ABP Majha



VIDEO पाहा : वय 79, पायाला दुखापत, तरीही शरद पवारांचा जज्बा कायम 



अजित पवार म्हणतात मी बंड केलं नव्हतं