निवडणुकीदिवशी सकाळी साडेसहा वाजता मतदान केंद्रावर जाऊन मतदान यंत्राची पाहणी करुन जे बटन दाबले त्यालाच मतदान होतं की नाही याची खात्री करण्याच्या सूचनाही पवारांनी कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. निवडणूक यंत्रणेवर शंका नाही, पण केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर शंका असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. मोदी सरकार ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्याविरोधात सर्व पक्षांनी एकत्रित लढा दिला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इतिहास नाही, भूगोल करुन दाखविला. पाकिस्तानचे त्यांनी दोन भाग केले. आता जे छाती बडवत आहेत त्यांना इतकंच सांगायचे आहे, की संकट आले तर आम्ही बरोबर आहोत. मात्र त्याचे राजकारण केले तर त्याची किंमत द्यावी लागेल असा इशाराही शरद पवारांनी दिला आहे. आजवर अनेक निर्णयांमध्ये अपयश आल्याने मोदी सरकारला राजकारण करावे लागत आहे. सर्वसामान्यांकडे काळा पैसा नाही, मोठ्या उद्योजकांकडे आहे पण तो मोदी सरकारला काढता आला नाही, असंही पवार म्हणाले.
"मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मात्र पहिली आत्महत्या झाली तेव्हा 2 दिवस झोप लागली नाही. यानंतर यवतमाळला भेटायला गेलो, 10 दिवसाच्या आत कर्जमाफी केली", असा दावाही त्यांनी केला. सरकारची भीक नको, आमचा शेतकरी कष्ट करायला तयार आहे असं म्हणत लबाडाचे आवताण जेवल्या शिवाय खरं नाही याचा पुनरुच्चार केला. खोट्या लोकांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. मोदी सरकारमुळे संपूर्ण शेती, अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. कांदा, द्राक्ष, सर्व शेतीपिकांचे भाव पडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.