Sharad Pawar on Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या काळ्या आईशी इमान राखण्यासाठी आपण आलो आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. बीडसारख्या जिल्ह्यात अनेकवेळा दुष्काळ असतो तिथं अतिवृष्टी झाली आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. याचा परिणाम शेतीवर झाला. संकटातून मार्ग काढायचा असतो तो मार्ग काढण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्राची असते. शेतकरी आक्रोश करतो आहे मात्र आजचे राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला. शरद पवार यांनी देवाभाऊ म्हणत झालेल्या निनावी जाहिरातींचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून प्रहार केला. नाशिकमध्ये आक्रोश मोर्चाला संबोधित करताना शरद पवार यांनी कृषी धोरणांवरून राज्यासह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. चुकीच्या धोरणांनी आत्महत्या होत असल्याचे ते म्हणाले.
आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाही
शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांचा संसार अडचणीत आला आहे. देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात पोस्टर लावले. तुम्ही शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याच दाखवलं. देवाभाऊ शिवाजी महाराज यांच्या काळात दुष्काळ पडला होता, त्यावेळी त्यांनी सोन्याची नाणी दिली आणि सोन्याचा नांगर शेतकऱ्यांना घेता आला ते शेती करू शकले. आज शिवाजी महाराज यांचं नाव घेत आहात आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाही. आपल्याला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. आगामी ठराविक दिवसांत तुम्ही मदत केली नाही तर नाशिकचा हा मोर्चास भविष्यात आणखी उग्र रूप घेईल. देवाभाऊ देशाच्या आजूबाजूला बघा काय घडत आहे. नेपाळमधे सरकार गेलं आणि भगिनीच्या हातात राज्य आलं आहे आणखी काही मी बोलणार नाही.
10 दिवसांत आम्ही 70 हजार कोटींचं कर्ज माफ केलं
त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भगत 2 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यातील संख्या जास्त आहे. शेतकरी जीव का देतो कारण त्याच्या संकट काळात त्याच्या पाठीशी राहत नाही. त्यामुळे आत्महत्या वाढायला लागल्या आहेत. कृषीमंत्री असताना एकेदिवशी माझ्या वाचनात आलं की, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग याना विनंती केली शेतकरी जीव देतोय त्यासाठी आपल्याला दिल्लीत बसून विषय सुटणार नाही, त्यासाठी त्या ठिकाणी जायला हवं. दुसऱ्या दिवशी आम्ही यवतमाळला गेलो. तिथं जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. शेतकऱ्याची बायको रडली. मी तिला विचारलं मालकाने जीव का दिला तिने सांगितलं कर्ज वाढलं होतं. सोसायटी देता आलं नाही. त्यानंतर सावकाराच कर्ज काढलं ते देखील थकलं होतं. त्यानंतर सावकार घरी आला आणि आमच्या अब्रूचा पंचनामा केला हे त्यांना सहन झालं नाही. त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर 10 दिवसांत आम्ही 70 हजार कोटी कर्ज देशात माफ केल. नाशिकचा कांदा घरात जातो, त्याचे दोन पैसे शेतकऱ्याला मिळावेत ही त्याची इच्छा असते. ज्यामुळे मुलीचं लग्न, मुलांचं शिक्षण करता येईल. मात्र, केंद्र सरकारने निर्यात बंदी केली, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या सरकारला शेतकऱ्यांच दुख समजत नाही, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या