Akola: गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील विशेषतः शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या अनेक घटना कानावर पडतायत . सुशिक्षित मुलींना शेतकरी तरुणापेक्षा शहरातील नोकरदार मुलाला अधिक पसंती असल्याचं चित्र असताना ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळणं अवघड होऊन बसलंय . नुकतंच अकोल्यातील एका तरुणांनं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहून ' मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या मी तुमचे उपकार विसरणार नाही ' असं साकडं घातल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आता कामाला लावलं आहे .
महाराष्ट्रातील लग्नाळू तरुणांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय. डिसेंबर 2022 मध्ये सोलापूर मध्ये लग्नाळू तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. फेटा, मुंडावळ्या, वाजंत्री आणि घोड्यावर बसलेले 25 पेक्षा अधिक तरुण नवरी मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले होते. तर नागपुरातही अधिवेशन काळात दोन वर्षांपूर्वी एका तरुणाने लग्न व्हावं, या प्रश्नावरून आंदोलन केलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
8 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवार अकोल्यात आले होते . कान्हेरी सरपंच येथील शेतकरी संवाद कार्यक्रमानंतर एका 34 वर्षीय पठ्यानं शरद पवारांना लग्नासाठी पुढाकार घेण्याचं निवेदन दिलय . या निवेदनाची सध्या एकच चर्चाय . एकीकडे वय वाढत जातंय . आता लग्न झालं नाही तर भविष्यात माझं लग्न होणार नाही. मी एकटाच राहील .माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही असं साकडे या तरुणांना घातल्याने शरद पवारांसह अनिल देशमुख आणि इतर नेते स्तब्ध झालेत . हे पत्र दुसऱ्या दिवशी मुंबईत शरद पवारांनी जयंत पाटलांसह आपल्या इतर नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दाखवलंय .या पत्रावर चर्चा झाली आहे . या तरुणासाठी जे करता येईल ते करा अशा सूचना शरद पवारांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात .
तरुणाच्या निवेदनाची गंभीर दखल, पदाधिकाऱ्यांना लावलं कामाला
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अनिल देशमुख म्हणाले, "शरद पवार सर्व समस्यांवर उपाय शोधू शकतात, या अपेक्षनेच अकोल्यातील त्या तरुणाने शरद पवार यांच्याकडे आपल्या लग्नाविषयीची तक्रार पत्राद्वारे मांडल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.. 8 नोव्हेंबर रोजी शरद पवार अकोल्याच्या दौऱ्यावर असताना तो तरुण शरद पवार यांना भेटला होता.. आणि त्याने '34 वर्षाचा होऊन सुद्धा लग्न होत नाही, एकटेपणा जाणवतो अशी तक्रार त्या पत्रात मांडली होती, शरद पवारांनी मुंबईत पोहोचल्यानंतर आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र दाखवललं आणि विदर्भातील खासकरून अकोल्यातील पदाधिकाऱ्यांनी त्या तरुणाला मदत करावी असे निर्देश दिले आहे.. आमचे पक्षातील स्थानिक पदाधिकारी त्या तरुणांसाठी जे करता येईल ते प्रयत्न करतील असेही अनिल देशमुख म्हणाले.. ग्रामीण भागातील तरुणांचे लग्न होत नाही.. तरुण मुली शेतकरी नवरा नको अशी भूमिका घेत असून ही एक सामाजिक समस्या झाली आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे असंही देशमुख म्हणाले..
काय लिहिलं आहे पत्रात?
आदरणीय साहेब!, माझे वय वाढत आहे. मी आता 34 वर्षांचा आहे. भविष्यात माझे लग्न होणार नाही. मी एकटाच राहील. तरी, माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायलाही मी तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालविण्याची हमी देतो. साहेब!, मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही.