Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर फेरविचार करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला गेले आणि त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली. त्यानंतर शरद पवारांनी या निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचं सांगितलं. पण कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं तर शरद पवार आपला निर्णय बदलणार नाहीत असंही शरद पवारांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.
'लोक माझे सांगाती' या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. शरद पवारांनी हा निर्णय घेऊ नये यासाठी सर्वच नेत्यांनी त्यांना गळ घातली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर यावेळी भावूक झाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर ठिय्या मांडला आणि शरद पवारांच्या राजीनाम्याला विरोध केला.
शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. त्यानंतर अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली आणि कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या.
काय म्हणाले अजित पवार?
राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संदेश सांगितला. ते म्हणाले की, "आम्ही शरद पवार साहेबांसोबत बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. त्यानंतर पवार साहेबांनी दोन-तीन दिवसात यावर विचार करतो असं सांगितलं. पण कार्यकर्ते उपाशी राहून आंदोलन करत आहेत हे त्यांच्या मनाला पटलं नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी घरी जावं असं त्यांनी सांगितलं. जर कार्यकर्त्यांनी इथेच थांबण्याचा हट्ट केला तर मात्र आपण निर्णय बदलणार नाही असं पवार साहेबांनी सांगितलं आहे."
काय म्हणाले शरद पवार?
अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर शरद पवारांनी नव्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. या समितीमध्ये प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलिप वळसे पाटील, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांंचा समावेश आहे. ते अध्यक्षपदाचा निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं. मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षासाठी उपलब्ध असेन असं आश्वासनही त्यांनी दिलं.