सातारा : साताऱ्यात राष्ट्रवादी अंतर्गत सुरु असलेल्या गटबाजीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल शब्दात फटकेबाजी केली. आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात, असं म्हणत खासदार उदयन राजे यांच्या स्टाईलवर पवारांनी मार्मिक शेरेबाजी केली.


सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीतच उदयनराजे समर्थक आणि उदयनराजे विरोधक असे दोन गट आहेत. या मुद्द्यावरुन पत्रकारांनी शरद पवारांना जिल्ह्यात पक्षांतर्गत निर्माण झालेल्या पेचाबाबत प्रश्न केला.
दरवाजा न उघडल्याने शरद पवार आतच अडकले!

आपण आल्यावर सर्व पेच सुटतात असं म्हणत पवारांनी उदयनराजेंच्या कॉलरच्या स्टाईलवरुन हसत हसत टोला मारला.

'काही पेचबीच होत नाहीत. मी असल्यावर सगळं ठीक होतं. उतारा काढायची वेळच येत नाही. तुम्ही बघा त्यावेळेस सगळे सरळ असतात. अशी असते ती कॉलर अशी होते' असं सांगत उदयनराजेंप्रमाणे उभी असणारी कॉलर पवारांनी खाली करुन दाखवली.

खरं तर उदयनराजेंवरुन निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांना पवार शांतपणे उत्तरं देतात. मात्र आज पहिल्यांदाच त्यांनी उदयनराजेंच्या स्टाईलवरुन मिश्किलपणे भाष्य करत पत्रकारांमध्ये हशा पिकवला.



शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी सकाळी 11 च्या सुमारास पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेनंतर शरद पवार सभागृहाच्या बाहेर पडण्यासाठी निघाले. मात्र दरवाजा पूर्णत: लॉक झाल्यामुळे पवारांना जवळपास 10 मिनिटं ताटकळत उभं राहावं लागलं.

अनेक जण दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र काही केल्या दरवाजा उघडतच नव्हता. सुमारे दहा मिनिटाच्या प्रयत्नानंतर हा दरवाजा उघडला आणि शरद पवार बाहेर आले.

परंतु दहा मिनिटांच्या काळात पवारांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव नव्हते. ते सगळ्यांना शांत राहण्यास सांगत होते. तसंच त्यांनी मिश्किलपणे ही घटना हाताळली.