Sharad Pawar : जेपीसी संदर्भातील आपलं वक्तव्य आणि भूमिका यावर ठाम असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. जेपीसी म्हणजे, जॉईंट पार्लामेंटरी कमिटी (Joint Parliamentary Committee)  यामध्ये जेवढे सदस्य असतात, त्यामध्ये सर्वाधिक सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे असतात. त्यामुळे या समितीमध्ये विरोधी पक्षांना खूप जास्त स्थान मिळू शकत नाही. त्यामुळेच जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती यामध्ये जास्त परिणामकारक ठरेल, असं मत पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार(Sharad Pawar News) यांनी मांडलं आहे. 


हिंडनबर्ग अहवालासंदर्भातही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. हिंडनबर्ग ही परदेशी कंपनी आहे. या कंपनीचं नाव यापूर्वी कधीही ऐकलेलं नाही. त्यामुळे अशा कंपनीच्या अहवालापेक्षा या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं दिलेला अहवाल आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ही आमची भूमिका आहे, याचा विरोधकांच्या एकजुटीवर काहीही परिणाम होणार नाही, असंही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. 


शरद पवार म्हणाले की, "जेपीसीमध्ये दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती असते. ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्यांना या कमिटीमध्ये अधिक जागा मिळतात. या कमिटीमध्ये विरोधकांचे सदस्य कमी, सत्ताधाऱ्यांचे सदस्य अधिक असतील. याप्रकरणाची चौकशी नीट करावी अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. जेपीसीला मी विरोध करत नाही, जेपीसीचा मीही अध्यक्ष होतो. जेपीसी बहुमत बळावर समिती असते, त्यामुळे सुप्रीम कोर्ट समिती प्रभावी ठरेल. बाहेरची संघटना सांगेल त्यापेक्षा सुप्रीम कोर्ट सांगेल ते जनता स्वीकारेल." 


पाहा व्हिडीओ : Sharad Pawar Full PC :हिंडनबर्ग मला माहीत नाही, गांधी-ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी पवारांची पत्रकार परिषद



...म्हणून जेपीसीसंदर्भात शंकेला वाव : शरद पवार 


शरद पवारांनी जेपीसीसंदर्भात स्पष्टीकरण देताना एक उदाहरणही दिलं. त्यांनी म्हटलंय की, "जर जेपीसी 21 लोकांची असेल तर 15 लोक सत्ताधारी पक्षाचे म्हणजे, भाजपचे असतील. तर सहा ते सात लोक विरोधी पक्षाचे असतील. ज्या समितीत विरोधी पक्षाचे नेते इतके कमी आणि सत्ताधारी पक्षाचे लोक अधिक याचा ज्याची चौकशी नीट करावी अशी अपेक्षा त्यावर शंका व्यक्त करण्याला वाव आहे." पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, "काँग्रेस किंवा इतरांच्या मताचा मी सन्मान करतो, पण मी माझं मतंही सांगतोय. आता 19 पक्षांचं एकमत आहे, पण त्यातील 19 पक्षांना जेपीसी समितीत स्थान मिळणार नाही." 


काय म्हणाले होते शरद पवार? 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत अदानी समुहाच्या मुद्द्यावर म्हटलं होतं की, हिंडेनबर्गच्या अहवालाला इतकं महत्त्व का दिलं जातंय? आम्ही त्यांच्याबद्दल कधीच ऐकलेलं नाही, त्याची पार्श्वभूमी काय आहे. जेव्हा आपण असे मुद्दे उपस्थित करतो, ज्यामुळे संपूर्ण देशात गोंधळ होतो, तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याची किंमत मोजावी लागते, या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. लक्ष्य केल्यासारखं दिसतंय.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Congress On Sharad Pawar: अदानी प्रकरणी JPCच्या मागणीला शरद पवारांचा पाठिंबा नाही; काँग्रेस म्हणतंय...