अमरावती: एसटी कामगारांना भडकवलं आहे आणि त्यांना चुकीच्या मार्गाला लावलं, त्यामुळेच पुढचा दुष्परिणाम घडला असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या "संवाद बैठक" मेळाव्यात ते बोलत होते. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "एसटी कामगार हा समाजाचा लहान घटक आहे. या सर्वसामान्य एसटी कामगारांना भडकवण्यात आलं आणि त्यांना चुकीच्या मार्गाला लावलं. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसून आले. दरम्यान या आंदोलनामागे भाजपच असल्याचा दावा हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला आहे."


राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, "सर्वसामान्य एसटी कामगारांना चुकीच्या मार्गाला नेण्याचं काम काहीजणांनी केलं. त्यांना भडकवण्यात आलं."


केंद्रात बसलेल्यांनी 'काश्मीर फाईल्स' पाहण्याचे आवाहन करावे हे दुर्दैवी आहे, भाजपचे हे काम हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावण्याचे आहे असा आरोपही शरद पवारांनी केला. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अमरावतीत आज "संवाद बैठक" मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री राजेंद्र शिंगणे, एकनाथ खडसे, आमदार अमोल मिटकरी, गुलाबराव गावंडे, सुबोध मोहिते यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमाला पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. 


एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने काल, शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश घेतला आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचं समोर आलं. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून त्याचा तपास सुरू केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :