पुणे : वाढत्या महागाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. देशात सध्या जो राजकीय पक्ष सत्तेत आहे, त्यांनी विरोधात असताना वेगवेगळं चित्र जनतेसमोर मांडलं, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी जाहिरात केली, पण आज हा सवाल त्यांनाच विचारावा वाटतो आहे, असं शरद पवार म्हणाले.


देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असल्याचंही शरद पवार म्हणाले. 3 वर्षांपूर्वी हेच लोक विचारत होते, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आता त्यांनी 3 वर्षातच कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हे दिसतंय, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

नारायण राणेंना टोला

शरद पवार यांनी नारायण राणे यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला. राणेंच्या भागातील म्हणजे सिंधुदुर्गातील एका मंत्र्याने असं विधान केलं की राणेंची नापसंती ही लोकांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे लोकांना त्यांचा निर्णय कितपत आवडेल, याबाबत आज काही बोलता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

नारायण राणे यांनी नुकताच काँग्रेसला रामराम केला आहे. 21 सप्टेंबरला त्यांनी कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.