पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाचं उद्धाटन करण्यात आलं.

 

यावेळी पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. राजकीय जीवनात जरी आमचं शत्रुत्व असलं तरी व्यक्तिगत जीवनात आम्ही कधीच हात राखून बोललो नाही.

 

व्यक्तिगत जीवनातला प्रेमाचा ओलावा आम्ही नेहमीच जपला असं पवार यांनी यावेळी सांगितलं.

 

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माणसाला वर नेऊन ठेवणं हे बाळासाहेबांचं वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

याशिवाय सुप्रिया सुळे या जेव्हा राज्यसभेच्या उमेदवार होत्या, त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांच्याविरोधात उमेदवारही दिला नाही. सुप्रिया आमच्या अंगा खांद्यावर खेळली. त्यामुळे ती बिनविरोध राज्यसभेत जाईल, असं बाळासाहेब म्हणाले. त्यावर मी म्हणालो तुमच्या मित्रपक्षांचं काय? तर तुम्ही 'कमळीची काळजी करु नका', असं बाळासाहेब म्हणाले होते, अशी आठवण पवारांनी सांगितली.

 

तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही पूर्वीची माणसं मैत्री जाणणारी, जपणारी होती  असं म्हणत भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नसल्याचीही आठवण करून दिली.

शरद पवारांचं भाषण



 

 

उद्धव ठाकरेंचं भाषण