पुणे : शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार हे अस्वस्थ आहेत. आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत चर्चा कुणाशीही केली नाही. अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी आणि राजीनामा दिल्यानंतर माझ्याशी देखील चर्चा केली नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. मात्र कुटुंबप्रमुख माझी जबाबदारी आहे. त्यामुळे यामागची कारणं जाणून घेतली जातील, असेही पवार म्हणाले.


पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या राजीनाम्याबद्दल मला काहीही माहिती नाही. आजच अजित पवार यांनी आपल्या कुटुंबात सांगितलं की, सहकारी संस्थेत मी काम करत असताना काही कारणांनी सहकारी संस्था अडचणीत आल्या. यामध्ये त्यांचं नाव घेतलं गेलं आणि त्यासोबत माझंही नाव घेतलं गेलं. त्यामुळं ते अस्वस्थ होते, असेही पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी त्यांच्या मुलाला सांगितले की, काकांसारख्या (शरद पवार) व्यक्तीला काहीही दोष नसताना अशा गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. त्यांचा काहीच सहभाग नसताना त्यांची चौकशी केली जाते, ही राजकारणाची पातळी घसरली आहे. आपण यातून बाहेर पडलेलं बरं, आपण शेती किंवा व्यवसाय करू. हे राजकारण गलिच्छ स्तराचे आहे, असे अजित पवारांनी त्यांच्या घरी सांगितले असल्याचे शरद पवारांनी सांगितले. मात्र मी त्यांच्याशी या संदर्भात बोलेन, कुटुंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे, असेही पवार म्हणाले.

अजित पवार यांच्याशी मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होत नाही. त्यांचा स्वभाव स्पष्टवक्ता आहे. मी कुटुंबप्रमुख म्हणून या प्रकरणात लक्ष घालणार आहे. ती माझी जबाबदारी आहे, असेही शरद पवार म्हणाले. काल, परवा आम्ही सोबत होतो. निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार ठरवतानाही ते होते. तिथंही त्यांची मतं त्यांनी ठेवली, असेही पवार यांनी सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.  पवार यांनी आपला राजीनामा  बागडे यांना मेलद्वारे पाठविला. अजित पवार हे बागडे यांच्याशी फोनवर बोलले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. याबाबत बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले आहे. ते माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला. आमच्या नेहमीच्या फाॅरर्मटमध्ये तो आला असल्याने तो स्वीकारला असल्याचे बागडे यांनी सांगितले. या विधानसभेची मुदत संपायला थोडाच अवधी असताना पवार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.