Praful Patel on Sharad Pawar भंडारा :

  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी नुकतेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत आम्ही पक्ष फोडाफोडीचे राजकारण हे शरद पवारांकडून शिकलो असल्याचे म्हटले आहे. धर्मरावबाबा आत्रामांच्या या टीकेनंतर आता खासदार  प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी देखील या टीकेच्या सुरात सुर मिसळवत निशाणा साधला आहे. शरद पवार हे माझ्यासाठी आदरणीय होते, आहेत आणि कायम राहतील. पण एका आदरणीय नेत्याने आपला सन्मान कधीही कमी होऊ दिल्या नाही पाहिजे,  असे माझ्या मनात असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. 


राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांच्यासोबत छगन भुजबळ हे दौऱ्यामध्ये नव्हते. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या अनुपस्थितिचा कुठलाही अर्थ, अनर्थ काढू नका, आम्ही महायुती म्हणून सगळे सोबत असल्याचे सांगितलं. सोबतच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकतीने लढणार आहोत, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. तर राज्याचे उपमुखयमंत्री अजित पवार हे कोविड काळात वेश बदलुन दिल्लीला जात होते अशी टीका विरोधकांनी केली होती. यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की,  अजित पवार हे महाराष्ट्राचे महत्वाचे नेते असून त्यांच्यावर अशा पद्धतीने खालच्या पातळीवर टीका करणे योग्य नाही. असा सल्ला टीका करणाऱ्यांना त्यांनी दिलाय.


विधानसभेत कोणती सीट कोण लढणार हे अजूनही ठरलेलं नाही- प्रफुल्ल पटेल 


आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्ष कोणत्या जागेवर लढणार यावर अनेक चर्चा सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत. योग्य पद्धतीने जागांचा वाटपही होणार आहे. मात्र, कोणता पक्ष कुठे लढेल अजूनही याबद्दल चर्चा झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी मृत्यू झालेला मनसे कार्यकर्ता जय मालोरकर हा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये येणार होता. असा गौप्स्फोट अमोल मिटकरी यांनी केला होता. यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता, मला या संदर्भात काही माहिती नाही. असे म्हणत सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी एक सल्ला दिला त्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर घसरवू नये असे प्रफुल पटेल म्हणाले.


राज्याच्या राजकारणाच्या स्तर घसरू देऊ नका - प्रफुल्ल पटेल 


राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये पेन ड्राइव वरून वाद पेटलेला आहे. यावर प्रफुल पटेल यांनी सर्वपक्षीय नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या स्तर खाली येऊ देऊ नका. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते, असा सल्ला त्यांनी दिला आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून देखील राजकारणाच्या स्तर घसरू देऊ नका, सर्वांचा सन्मान करायला शिका, असेही प्रफुल पटेल म्हणाले.


हे ही वाचा