मुंबई : शरद पवार हे सहकार चळवळीचे आधारस्तंभ आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची स्तुती केली आहे. तसेच, सहकार चळवळीसाठी पवारांसारख्या नेत्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.
मुंबईत डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या शतकपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शरद पवार हेसुद्धा उपस्थित होते.
आर्थिक अडचणीत आलेल्या सिटी बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केंद्र सरकारच्या सहकार धोरणावर नाराजी व्यक्त केली. सहकारी बँकाबाबत अर्थमंत्री अरुण जेटली काम करतो करतो म्हणतात, पण प्रत्यक्षात होत नाही. आम्ही सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखं वाटते, आता तर आम्ही निवडणूक विरोधात लढवायचे ठरविले आहे, असे खासदार अडसूळ यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार काय म्हणाले?
“आता दिवस थोडे वेगळे आहेत. सहकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होताना दिसतो आहे. चार-पाच लोकांची चूक होते, पण त्याची किंमत सर्व लोकांना भोगावी लागते. अशा परिस्थितीत सरकारने मात्र पाठीशी राहिले पाहिजे.”, असे शरद पवारांनी सहकारी बँकांबाबत बोलताना म्हटले.
“बॅंक अडचणीत आली की सहकार्य करण्याऐवजी बंधने घातली जातात. काहीतरी गडबड आहे, असं ग्राहकांना वाटतं आणि त्यामुळे आणखी अडचणी वाढतात. संकटातून बाहेर काढण्याच काम राहते आणि समस्याच वाढत जातात.”, असेही पवार म्हणाले.
“पेशंट अडचणीत आहे, त्यावेळेस औषध दिले जात नाही. सहकारी बँकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा योग्य नाही. जो बलवान आहे, त्या मोठ्या बँकांना मदत केली जाते. पण सामान्य माणसाला मदत करणाऱ्या सरकारी बँकांकडे मात्र लक्ष दिले जात नाही. सामान्य माणसाला मदत करण्याचे काम सहकार क्षेत्र करते. सहकारी चळवळ टिकवण्याचे काम केले पाहिजे. राजकारण न आणता मदत केली पाहिजे.”, अशा भावना शरद पवार यांनी या कार्यक्रमात व्यक्त केल्या.
“नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला, आता नोटा बदलून देत नाहीत. काय करणार आता बँका आणि चेअरमन? यामुळे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली, नोटा बाद करु नका असे आदेश आता दिले. ज्या बँकांना मदत करायची त्यांना केली जात नाही आणि ज्या बलदंड बँका त्यांना हजारो कोटी मदत केली जाते हे अवघड आहे.”, असे शरद पवार म्हणाले.