अकोला : "विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी आहे. त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडलेली नाही. शरद पवार यांच्या घरावर मोर्चा येणार आणि तो आक्रमक असेल हे माहित असूनही काही कर्तव्य केलं नाही, म्हणून विश्वास नांगरे पाटील यांना ताबडतोब निलंबित करा," अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी 8 एप्रिल रोजी हल्ला केला. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक हल्लाबोल केल्याने त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलीस फौजफाटा आल्यानंतर काही काळाने परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. तर शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणाची चौकशी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. 


याविषयी पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. ते म्हणाले की, "4 एप्रिलला मुंबई पोलीस अतिरिक्त आयुक्त निशित मिश्रा यांनी सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना एसटी कर्मचारी मंत्रालय, मातोश्री आणि सिल्वर ओक इथे आंदोलन करणार असल्याचं पत्राद्वारे कळवलं होतं. चार दिवसांआधी गुप्तचर विभागाने याची शक्यता वर्तविली होती. चार दिवस आधी हल्ल्याच्या शक्यतेची माहिती होऊनही पोलिसांनी काहीच केलं नाही." "त्यांनी आपल्याकडे आलेली माहिती पोलीस आयुक्तांना तसंच मुख्यमंत्र्यांना दिली होती का?" असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. तसंच "सकाळ आणि संध्याकाळ राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून ब्रीफिंग होतं. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आदेश दिले होते का?, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा," अशी मागणी प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


'विश्वास नांगरे पाटलांना ताबडतोब निलंबित करा'
"सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडून काढून घ्यावी. एक माजी मुख्यमंत्री, एका पक्षाचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार असलेल्या शरद पवार यांच्या घरावर मोर्चा येणार, तो आक्रमक होणार हे माहित असूनही त्यांनी काहीही कर्तव्य केलं नाही, म्हणून विश्वास नांगरे पाटील यांना तातडीने निलंबित करा," अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.