अहमदननगर : अवघ्या सात मिनिटांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. सीट बेल्ट बाहेर राहिल्याचे लक्षात येताच पायलटने हॅलिकॉप्टर लँड केले. त्यानंतर सीट बेल्ट व्यवस्थित करुन शरद पवार हेलिकॉप्टरमधून व्यवस्थित रवाना झाले. दरम्यान हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती.
एका कार्यक्रमासाठी शरद पवार हे नगर येथे आले होते. कार्यक्रमानंतर पुण्याला जाण्यासाठी ते हेलिकॉप्टरमध्ये बसले. हेलिकॉप्टरने उड्डाण केले. उड्डाणानंतर सात मिनिटांनी पायलटने सीट बेल्ट दरवाजात अडकल्याचे पाहिले. त्यामुळे त्याने लगेच हेलिकॉप्टर खाली उतरवले.
हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर सीट बेल्ट व्यवस्थित लावण्यात आला. त्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले. नगरच्या हेलिपॅडवर ही घटना घडली. या घटनेमुळे प्रशासन हवालदिल झाले होते.
याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही हेलिकॉप्टरचे असे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात ओव्हरलोडिंगमुळे देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर लँड करावे लागले होते.