Sharad Pawar gets Income Tax notice : दोन आठवड्यांपासून राज्यातील सत्तानाट्य सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत इनकम टॅक्सची नोटीस आल्याचं सांगितलं. ते पुण्यात बोलत होते. 


यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, 'मला प्रेम पत्र आलंय.. इनकम टॅक्सचे प्रेमपत्र... 2004, 2009, 2014 आणि 2020 च्या  लढवलेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राबद्दल इनकम टॅक्सने नोटीस पाठवली आहे.' यावेळी बोलताना शरद पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला शुभेच्छाही दिल्या. 


फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबद काय म्हणाले?
 दिल्लीचे अदृष्य हात कसे काम करतात हे आज पुन्हा एकदा दिसून आले. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी सुचना आलेली असावी असं दिसतंय. कदाचित त्यांची इच्छा नसावी, असे शरद पवार म्हणाले. 


राज्यपालांवर पुन्हा प्रश्नचिन्ह?
राज्यपालांबद्दल सहसा बोलू नये. मी 1966 पासून सगळे राज्यपाल पाहिले. सगळ्यांनी महाराष्ट्राच्या परंपरेत भर घातली या राज्यपालांनी त्यामधे किती भर घातली याचा शोध घ्यावा लागेल, असा टोला शरद पवार यांनी लगावला.  


बंडखोर आमदार परत येणार नाहीत -
एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार त्यांच्यापासून वेगळे होतील असं वाटत नाही.  कारण त्यांच्यात जी काही देवाणघेवाण झाली ती मोठी आहे. जर हे आमदार महाराष्ट्रात असते तर मी काही करु शकलो असतो.  पण हे आमदार राज्याच्या बाहेर होते, असे पवार म्हणाले. 


सरकार पाडण्याची तयारी आधीपासूनच -
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याची तयारी आधीपासून झाली होती. त्याशिवाय सुरत, गुवाहाटी या सगळ्या गोष्टी एका दिवसात होत नाहीत, असे शरद पवार म्हणाले. 


शिवसेनेतून बाहेर गेले, ते नंतर पराभूत झाले -
शिवसेनेत बंड झालं हे काही पहिल्यांदाच झालं नाही, जे लोक शिवसेनेतून बाहेर गेले, ते नंतर पराभूत झाले. छगन भुजबळ आणि नारायण राणे हे पराभूत झाले. माझ्या नेतृत्वाखाली निव़डणूक झाल्यानंतर 67 आमदार निवडून आले होते. मी काही दिवसांसाठी राज्याच्या बाहेर गेलो आणि सगळे सोडून गेले, फक्त सहा आमदार माझ्यासोबत राहिले. मग नंतरच्या निवडणुकीत सोडून गेलेले जवळपास सर्वजण पराभूत झाले. उद्धव ठाकरे हे सत्तेला चिकटून राहिले नाहीत हे योग्य झालं.


फडणवीसांचा चेहराच सांगत होता - 
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दोन नंबरची जागा त्यांनी आनंदाने स्वीकारली असं काही दिसत नाही, त्यांचा चेहराच सांगत होता. पण देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे, स्वयंसेवक संघाचे. त्यामुळे एकदा आदेश आल्यानंतर तो स्वीकारणे हे त्यांचे संस्कार आहेत. शिंदे मुख्यमंत्री होतील याची कुणालाच कल्पना नव्हती, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती. ते म्हणाले की, मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो त्यावेळी शंकरराव चव्हाण मंत्री होते, त्या आधी त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्रीपदानंतर मंत्रीपद स्वीकारलं.