मुंबई: गेल्या 25-30 वर्षांपासून शिवसेना मुंबईत नंबर एकचा पक्ष आहे. काहीही असलं तरी आज भाजप त्यांचा क्रमांक एक घेऊ शकत नाही. शिवसेना सत्तेपर्यंत पोहोचणार नाही, पण सर्वाधिक जागांसह नंबर एक राहील, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी 'एबीपी माझा'शी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. राज्यापासून देशापर्यंतच्या विविध घडामोडींवर पवारांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

"विधानसभेत भाजपला जास्त जागा मिळाल्या. 

त्यामुळे त्यांचा  शिवसेनेकडे जास्त जागांचा आग्रह होता. 

मुंबई महापालिकेत  25 वर्षात सतत शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे.

यावेळीही भाजप त्यांचं नंबर एक क्रमांकाचं पद

घेऊ शकेल असं मला वाटत नाही", शरद पवार

हे राज्य जावे, ही श्रींची इच्छा उद्या हे सरकार पडेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास, त्याला राष्ट्रवादी हातभार लावेल, असं पवार म्हणाले. तसंच वसंतदादा पाटील यांचं सरकार पडलं त्यावेळी, हे राज्य जावे ही श्रींची इच्छा, असा अग्रलेख छापण्यात आला होता. त्याचा संदर्भ देत, हे राज्य जावे ही श्रींची इच्छा अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पवार म्हणाले.

"उद्या हे सरकार पडेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास,

त्याला राष्ट्रवादी हातभार लावेल",

शरद पवार 

सरकार पडल्यास राष्ट्रवादीचाही हातभार राज्यातलं फडणवीस सरकार पडल्यास राष्ट्रवादीचाही हातभार असेल असं शरद पवार म्हणाले. भाजपच्या केंद्रातील तीन नेत्यांना शिवसेनेत स्वारस्य नसल्यानं राज्यातील युती तुटलीय. याला फक्त भाजपच जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. मध्यावधी निवडणुका मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट निर्माण येईल, आणि कदाचित मध्यावधी निवडणुकांना सामोरं जावं लागेल, असं भाष्य मी दीड वर्षामागे केलं होतं. कालपर्यंत मी या मतावर ठाम होतो, मात्र काल उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं, त्यावरुन शिवसेना सत्ता सोडेल, असं मला वाटत नाही, असं पवार म्हणाले.

"शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास 5 वर्षे सत्तेत राहू,

असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर होईल,

याबाबत मला शंका वाटते",

शरद पवार 

शिवसेनेबद्दल दिल्ली भाजपत जास्त द्वेष राज्यापेक्षा माझं दिल्लीत जास्त लक्ष असतं. शिवसेनेबद्दल देवेंद्र फडणवीस जेवढे बोलतात, त्यापेक्षा जास्त कटुता दिल्लीतील भाजप नेत्यांना शिवसेनेबद्दल आहे. अडवाणी, वाजपेयी सामंजस्य होते. अडवाणी बाळासाहेबांना भेटायला गेल्याचं अनेकवेळा पाहिलं. मात्र आताची जी लिडरशीप आहे, त्यांचं शिवसेनेबद्दल टोकाचं मत आहे. तेच फडणवीसांकडे आलं असावं, असं शरद पवार म्हणाले.

"शिवसेनेबद्दल देवेंद्र फडणवीस जेवढे बोलतात,

त्यापेक्षा जास्त कटुता

दिल्लीतील भाजप नेत्यांना शिवसेनेबद्दल आहे".

भाजपने युद्ध इन्व्हाईट केलं शिवसेना आरे म्हटल्यावर कारे म्हणणारच हे माहीत आहे. अन्य पक्ष कोणी का रे म्हणणार नाही, पण शिवसेना का रे म्हटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे भाजपने स्वत:हून शिवसेनेशी वाद ओढावून घेतला आहे.  भाजपने टोकाची भीमिका घेतली नसती तर इतकं ताणलं नसतं, असं शरद पवार म्हणाले.

"भाजपने स्वत:हून शिवसेनेशी वाद ओढावून घेतला आहे.  

भाजपने टोकाची भीमिका घेतली नसती तर इतकं ताणलं नसतं"

कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावा लागेल  भाजपने उत्तर प्रदेशात कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यांनी काहीतरी विचार करुन ती घोषणा केली असेल.  तो विचार पाहूनच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात कर्जमाफीची मागणी केली असावी. शिवाय कर्जमाफीचा मुद्दा पुढे केल्याने, काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल, असं पवारांनी नमूद केलं.

"शिवसेनेला सत्ता सोडायची नाही,

म्हणून त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा काढलाय",

असंही पवार म्हणाले.

यशवंतरावांच्या संस्कृतीला फडणवीसांनी छेद दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभ्य, सुसंस्कृत व्यक्ती म्हणून अपेक्षा होती. शिवाय त्यांना केंद्राचा पाठिंबा आहे, ते परदेशात जाऊन बाहेरची परिस्थिती पाहून आले आहेत. मात्र त्यांनी अपेक्षाभंग केला. त्यांनी सहकाऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह आहे, असं पवारांनी नमूद केलं.

"यशवंतरावांनी महाराष्ट्रात एक संस्कृती रुजवली,

त्याला फडणवीसांनी छेद दिला",

असं घणाघात पवारांनी केला.

मुख्यमंत्र्यांची भूमिका सामंजस्याची नाही सहकाऱ्यातील कटुता वाढली की त्याचा प्रशासनावर परिणाम होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याची भूमिका घेणं आवश्यक असतं. वादाच्या वेळी मुख्यमंत्र्यांची जास्त जबाबदारी असते. सामंजस्यासाठी काही गोष्टी गिळायच्या असतात, पण इथे मुख्यमंत्री स्वत:च आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत, असं पवार म्हणाले.

"मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याची भूमिका घेणं आवश्यक असतं.

वादाच्या वेळी मुख्यमंत्र्यांची जास्त जबाबदारी असते".

शिवसेना-भाजपमध्ये भांडण लावण्यासाठीच ते वक्तव्य विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी फडणवीसांकडे संख्याबळ नव्हतं. त्यावेळी आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, असं मी स्टेटमेंट केलं. मात्र ते या दोघांमध्ये (शिवसेना-भाजप) सामंजस्य होऊ नये म्हणूनच केलं होतं. पण तरीही हे दोघेही सत्तेसाठी एकत्र येतील असंही वाटत होतं आणि ते आले. अडीच वर्षात महाराष्ट्राच्या प्रगतीच्या लौकिकाल धक्का बसला. गुंतवणुकीचं वातावरण राहिलं नाही. झारखंडकडे लोक गुंतवणूक करतायेत, पण महाराष्ट्रात नाही, अशी परिस्थिती असल्याचं पवारांनी नमूद केलं.

"आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, असं मी स्टेटमेंट केलं.

मात्र ते या दोघांमध्ये (शिवसेना-भाजप)

सामंजस्य होऊ नये म्हणूनच केलं होतं".

-शरद पवार 

मुख्यमंत्र्यांनी राज्यहिताची जपणूक करावी देवेंद्र फडणवीस यांनी सबंध राज्याच्या हितांची जपणूक करावी. मात्र ते करतात असं मला वाटत नाही.  फडणवीसांनी विदर्भाकडे जास्त लक्ष दिल्यास तक्रार नाही. तिकडे जास्त गुंतवणूक केली तरी चालेल, मला आनंद होईल. पण

"फडणवीसांचं लक्ष नागपूरमध्ये आपल्या मतदारसंघाभोवती आहे.

केवळ मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्र नाही",

असं पवारांनी सांगितलं.

मुंबईचं पाटणा झालंय का?  मुंबईचे प्रश्न आताचेच नाही. आम्हीही राज्य सरकारमध्ये होतो. तेव्हाही प्रश्न होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी इतक्या टोकाचं बोलण्याची गरज नव्हती. केंद्राने मदत करणं अपेक्षित असतंच. निव्वळ एकाला दोष देणं गरजेचं नाही. ही जबाबदारी सामूदायिक आहे. मुंबईत देशातील लोक येतात. त्यामुळे मुंबईवरील ताण मोठा आहे. मुंबईचे प्रश्न सर्वांनी मिळून सोडवणं गरजेचं आहे, असं पवार म्हणाले.

"मुंबईच्या विकासाबाबत केवळ एकाला दोष देणं चुकीचं आहे. 

मुंबईत देशातील लोक येतात. त्यामुळे मुंबईवरील ताण मोठा आहे.

मुंबईचे प्रश्न सर्वांनी मिळून सोडवणं गरजेचं आहे"