नवी दिल्ली: सिनेमा किंवा डॉक्युमेंट्रीमध्ये जर राष्ट्रगीत सुरु झालं, तर उभं राहण्याची गरज नाही, असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. मात्र थिएटरमध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं लागेल, असंही कोर्टाने म्हटलं आहे.


याशिवाय राष्ट्रगीताला उभं राहावं की नाही याबाबत चर्चा आवश्यक असल्याचं मतही कोर्टाने नोंदवलं.

राष्ट्रगीताला उभं राहण्याबाबत सध्यातरी कोणताही कायदा नसल्याचं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं.

गेल्या वर्षीचा निकाल

यापूर्वी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रगीताबाबत गेल्या वर्षीच ऐतिहासिक निर्णय दिला होता. सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये राष्ट्रगीताला उभं राहणं अनिवार्य केलं होतं. इतकंच नाही तर राष्ट्रगीतावेळी स्क्रीनवर तिरंगाही दाखवण्याचे आदेश दिले होते.

त्याशिवाय उभं राहून राष्ट्रगीताचा सन्मान करावा, असंही कोर्टाने म्हटलं होतं.  मात्र स्वत:च्या फायद्यासाठी राष्ट्रगीताचा वापर करु नये, असे निर्देश कोर्टाने दिले होते.

थिएटर्समध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरु करण्याबाबतचा कायदा सर्वात आधी महाराष्ट्र सरकारने केला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टानेही त्याबाबतचे आदेश दिले होते. मात्र आज कोर्टाने राष्ट्रगीताला कधी उभं राहावं आणि कधी राहू नये, याबाबत स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.