यावेळी पवार म्हणाले की, माझ्यापेक्षा आबा 20 वर्षांनी लहान होते. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांचे कर्तृत्व बहरण्याचा कालावधी होता. आबांच्या जाण्याचे दु:ख अंत:करणात कायम राहिल. मात्र पुढच्या पिढीला पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला रोहितच्या रुपाने आबा पहायला मिळतील. आबांच्या कुटुंबाला इथुन पुढे असेच प्रेम द्या. या प्रेमातून राज्याला कर्तृत्ववान नवी पिढी पहायला मिळणार असे शरद पवार म्हणाले.
आरआर आबा या हिमालयाच्या उंचीच्या माणसाचं कर्तृत्व न मोजता येणार आहे, असंही पवार म्हणाले. आबा आणि सामान्य माणसाचं एक वेगळं नातं होतं. त्यांनी स्वच्छ चारित्र्याचा आदर्श निर्माण करून काम केले. आबांची ग्रामीण भागाशी नाळ होती. ग्रामविकास मंत्री पदाच्या माध्यमातून झालेल्या अनेक कामांची दखल देशपातळीवर घेतली गेली, असेही ते म्हणाले.
राज्यात काही जिल्हे नक्षलवादाने ग्रासलेले असताना आबांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून घेतले. नक्षलवादी भागात मोटारसायकलवरून जाणारे राज्यातील पहिले मंत्री आबा होते. आजही आदिवासी बांधव आबांचे नाव घेतात, असेही पवार म्हणाले.
आबांचं स्थान महाराष्ट्रव्यापी होतं. आबांची उणीव राज्यात जाणवतेच. त्याहीपेक्षा राष्ट्रवादीला जाणवते. आबा असते तर आजचं चित्र वेगळं दिसलं असतं, असं यावेळी जयंत पाटील म्हणाले. 2024 साली या तासगाव मतदारसंघासाठी रोहितला पक्ष तिकीट देईल एवढी रोहितची मजल आहे, असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला.