जालना : येत्या 13 तारखेला विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.  जालना येथे विविध महामंडळावर नियुक्त झालेल्या सदस्यांचा ओबीसी समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.


दरम्यान राजकारणात आपण सरपंचापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळी पदं भोगून झाली आहेत. आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही. मात्र मुख्यमंत्री पदाबाबत पुढे बघू म्हणत त्यांनी सावध भूमिका घेतली.
राज्यात गणपती उत्सवानंतर आचारसंहिता लागू होईल आणि 15 ऑक्टोबरच्या जवळपास विधानसभा निवडणूक होईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच दिली होती. निवडणुकीसाठी भाजप तयार आहे. युतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उद्धव ठाकरे घेतील, असंही मुनगंटीवार म्हणाले होते.

यापूर्वीचं गणेशोत्सवानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याच्या चर्चा होत्या. आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दानवे यांच्या विधानानंतर या चर्चांना बळ मिळणार आहे. गणेशोत्सवानंतर अर्थात 12 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीनंतर विधानसभेच्या तारखा जाहीर होऊ शकतात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि आचारसंहिता 12 सप्टेंबर रोजी लागली होती. तर 15 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. यावेळीही मतदान आणि मतमोजणीची तारीख त्याच्या जवळपासच असण्याची शक्यता आहे.