पंढरपूर : नीरव मोदी याचा घोटाळा मोदी सरकारच्या काळातील असून, त्याची सखोल चौकशीची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. या नीरव मोदीबाबत मनमोहन सिंग सरकारवर आरोप केले जात असले, तरी नीरव मोदीने 2011 मध्ये फक्त खाते उघडले होते, बाकीची फसवणूक मोदी सरकारच्या काळातीलच असल्याचे पवार यांनी म्हटले.


पंतप्रधान कार्यालयाला याबाबत 2016 मध्ये कळवून देखील त्याची दखल न घेतल्याने हा नीरव मोदी देशाला फसवून पळून गेल्याचे सांगत, हा सर्व वर्ग भाजपला पाठिंबा देणारा असल्याचा आरोप पवार यांनी केला. या सर्व प्रकारच्या चौकशीची गरज पवार यांनी व्यक्त केली.

पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी पवार आले होते. यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचेसह काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रहार करताना पवार म्हणाले, “आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी या संघ स्वयंसेवकांना लाठ्या घेऊन काश्मीर सीमेवर पाठवावे म्हणजे भागवतांच्या बोलण्यात किती तथ्य आहे, ते देशाला कळेल.”

काश्मीर सीमेवर अतिरेक्यांशी लढताना रोज सैनिक शहीद होत असताना, सैन्यदलाच्या बाबतीत असे  कुप्रतिष्ठा करणारे विधान करणे योग्य नसल्याचे पवार यांनी सांगितले.

भिडे-एकबोटे यांच्याबाबत बोलताना सध्याचे सत्ताधीश त्यांच्या पाय पडत असल्याने त्यांच्यावर कारवाई होईल, असे वाटत नसल्याचा टोला पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

“राज्यातील जनतेचा आता या सरकारवर विश्वासच राहिला नसल्याने निराश लोक आता मंत्रालयात येऊन आत्महत्या करु लागले आहेत. आपली कामे हे सरकार करीत नसल्याची भावना झाल्यानेच मंत्रालयात आत्महत्यांचे सत्र सुरु झाले असून यातून आतातरी सरकारने धडा शिकवा.”, असे पवारांनी म्हटले.

आगामी राजस्थान , कर्नाटक आणि त्रिपुरा या राज्यातील निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागल्यास लोकसभा निवडणूक शेवटच्या दिवशीपर्यंत लांबतील, असे पवार यांनी सांगितले. शिवाय, सध्या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित येऊन समर्थ पर्याय निर्माण करु लागल्याचे पवार यांनी सांगितले.