औरंगाबाद : शेतमालाला हमीभाव हे लबाडाघरचं आवतान असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेची औरंगाबादेत सांगता झाली, यावेळी शरद पवारांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात समाचार घेतला.


हे सरकार फसवं आहे, ते केवळ आश्वासनं देतं असं म्हणत सरकारच्या कर्जमाफीवरही निशाणा साधला. राज्यातील महत्त्वाच्या कापसाच्या पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही असा हल्लाबोलही पवारांनी केला.

नोटाबंदीमुळे उद्योग क्षेत्रावर परिणाम झाला, याला पूर्णपणे सरकार जबाबदार असल्याचंही पवार म्हणाले. तसंच ट्रिपल तलाक हा मुस्लिमांना धर्माने दिलेला अधिकार आहे, त्यात सरकारने ढवळाढवळ करु नये असंही पवारांनी म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्याच्या पिकाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणेवर शरद पवारांनी जोरदार हल्ला चढवला. घोषणा तर केली, मात्र, हा हमीभाव कसा देणार, याचं विश्लेषण अर्थसंकल्पात केलं नसल्याचं पवार म्हणाले. तसंच तिहेरी तलाक बाबत धर्मानं दिलेल्या अधिकारात सरकारला ढवळाढवळ करता येणार नसल्याचंही पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांचाही हल्लाबोल

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सभेला परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांना इशारा दिला आहे. सरकार येतं सरकार जातं. तेव्हा आमचं सरकार आल्यावर वेगळा विचार करायला लावू नका, अशा शब्दात अजित पवारांनी पोलीस यंत्रणेला खडे बोल सुनावले.

धनंजय मुंडेंची सरकारवर जोरदार टीका

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही भाजप सरकारवर जोरदार टीका केली. पोलिसांनी सभेला नाकारलेली परवानगी म्हणजे भाजप-शिवसेनेनं धास्ती घेतल्याचं मुंडे म्हणाले आहेत. तसंच इंटरनेट बंद केलं, तरी सरकार जनतेचा आवाज कसा बंद करेल असा सवालही धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.