मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर सरकारने केलेल्या एअर स्ट्राईकसंबंधीच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सल्ला नाही तर पाठिंबा दिला असंही पवारांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.


पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याचं क्रेडिट भाजप घेऊ लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. दहशतवादी अड्डे माझ्या सल्ल्यानंतरच उध्वस्त केले असल्याचे वक्तव्य त्यांनी केलं होतं.

 

शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर चाकणमध्ये काल रविवारी हा गौप्यस्फोट पवारांनी केला. पुलवामा हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीत देशातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. मी माजी संरक्षण मंत्री असल्यानं तिथं मला आता काय करायचं? असा पहिला प्रश्न विचारला गेला. त्यावर मी देशाच्या तिन्ही दलांना फ्री हँड देत, दहशतवादी अड्डे उध्वस्त करण्याचे आदेश द्या, असा सल्ला दिला. माझ्या या सल्ल्याला सर्व प्रमुख नेत्यांनी होकार दिला, असे पवारांनी सांगितलं होतं.

शरद पवारांची फेसबुक पोस्ट

पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता. काल मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला.


परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्ष प्रमुखांची संमती होती.

भारतीय सैन्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिर मधील अतिरेक्यांच्या तळांवर  केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा व्हायला नको. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये, असे माझे मत आहे.