पुणे : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणीही विरोध केला नाही. पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरच खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम निर्णय घेऊ, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं.


'साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची माझ्यासोबत काल बैठक झाली. या बैठकीत कोणीही उदयनराजेंच्या नावाला विरोध केला नाही. पत्रकारांनी कशाच्या आधारे बातम्या दिल्या मला माहित नाही.' असं शरद पवार म्हणाले.

'आम्ही दोन प्रकारच्या बैठका घेतल्या. पहिली लोकसभेबद्दलची आणि दुसरी विधानसभेबद्दलची. कोणीही उदयनराजेंच्या नावाला विरोध केला नाही. आम्ही लवकरच साताऱ्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष आणि लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊ आणि खेळीमेळीच्या वातावरणात निर्णय घेऊ' असंही शरद पवारांनी सांगितलं.

उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये म्हणून बारामतीमध्ये उदयनराजेंच्या विरोधकांनी शरद पवारांना साकडं घातल्याचं वृत्त होतं. त्यामुळे संध्याकाळी उदयनराजेंनी तातडीने पवारांकडे भेटीची वेळ मागितली आणि पुण्यात भेट घेतल्याचं समोर आलं.

राफेलच्या किमती जाहीर करण्यात अडचण नाही

'राफेल विमानं देशासाठी उपयोगी आहेत. पण त्यांच्या किमतीबाबत मी बोलू शकत नाही. त्या विमानांच्या किमती जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने प्रकर्षाने केली आहे. ती द्यायला सरकारला काही अडचण असेल, असं मला वाटत नाही. सरकारने हा गुप्त करार असल्याचं सांगितलं. मीसुद्धा संरक्षण मंत्री होतो. त्या करारामध्ये तंत्रज्ञान आणि क्षमतेबाबत गुप्तता पाळली जाते. पण किंमत उघड करण्यास काहीच अडचण असण्याचं कारण नाही. 'बोफोर्स'च्या मुद्द्यावर हेच लोक त्यावेळी माहिती मागत होते.' असंही पवार म्हणाले.