Bharat Jodo Yatra : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra) निमंत्रण स्वीकारले आहे. आता हे दोन्ही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी सांगितली आहे. ही यात्रा पुढील महिन्यात (नोव्हेंबर) महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरें यांची मातोश्रीवर तर उद्धव ठाकरे यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण इथं भेट घेऊन भारत जोडो यात्रेचं निमंत्रण दिलं होतं.


7 नोव्हेंबरला राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यासाठी काल (17 ऑक्टोबर) काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यांना भारत जोडे यात्रेचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचीही भेटी घेतली होती. आता हे दोन्ही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी एका शिष्टमंडळासह या दोन्ही नेत्यांची भेट घेतली होती.


7 सप्टेंबरपासून कन्याकुमारीतून सुरु झाली होती भारत जोडो यात्रा


राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतून सुरु झाली होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये या यात्रेचा शेवट होणार आहे. एकूण 3 हजार 500 किमीचा प्रवास करुन 12 राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे. संपूर्ण दौरा पूर्ण होण्यासाठी तब्बल 150 दिवस लागणार आहेत. सध्या ही यात्रा कनार्टकमध्ये सुरु आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्थेवरून भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल; बाळासाहेब थोरातांना विश्वास