Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Expressway) भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्याआधी भूसंपादन थांबवलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. 

Continues below advertisement


महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग - पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाईसहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग आहे. सदर प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार असून प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.


कोणत्या जिल्ह्यामंधून जाणार होता शक्तिपीठ महामार्ग?


विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे.  राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीडलातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा  खर्च येणार आहे.


कोणत्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार?


कोल्हापूर - अंबाबाई, तुळजापूर - तुळजाभवानी. नांदेड - माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ,  हिंगोली जिल्ह्यातील  औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.  


महामार्गासाठी किती जमीन लागणार?


या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील 27 हजार 500  एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे  शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.  ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी गरज नसताना महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.  हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपणार आहे.


लोकसभा निवडणुकीत बसला फटका


शक्तिपीठ महामार्गात कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यामुळे महायुतीचे अनेक उमेदवार लोकसभेत पडलेत असल्याचं लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं होतं.


शेतकऱ्यांचा  महामार्गाला आक्षेप का?



  • रस्त्यातील डोंगर पोखरून बोगदे निर्माण केले जाणार, अनेक ठिकाणी भर घालून छोट्या नद्या-नाले  बुजवले जाणार.
    शेतकऱ्यांबरोबर पर्यावरणाचाही विध्वंस होणार 

  • सध्याच्या जमिनी या आमच्या जगण्याचे एकमेव साधन आहे. विशेषत: जमिनी यापूर्वीच गुंठ्यावर आल्या आहेत. आता जमिनी संपादित केल्यास शेतकरी अल्पभूधारक अथवा भूमीहीन होऊ शकतो. 

  • काही जमिनी या बारमाही बागायती आहेत तर काही भविष्यात एनए प्रयोजनाच्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानक, रेल्वे कोच कारखाना, साखर कारखाना, औद्योगिक वसाहतीपासून जवळच्या अंतरावर जमिनी आहेत. त्यामुळे जमिनीचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे. या जमिनी संपादित केल्यास कधीही भरुन न येणारे नुकसान होणार आहे.  


शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता, VIDEO:



संबंधित बातमी:


Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग नेमका कुठून कुठे, विरोध का, खर्च किती, महत्त्वकांक्षी प्रकल्पाची A टू Z माहिती!