पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena UBT) मोठा धक्का दिला आहे .स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मुंबईत प्रवेश करत आहेत. त्याची तयारी देखील त्यांच्या कार्यालयात झाल्याचं चित्र आहे. आज दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा मुंबईत त्यांचा प्रवेश पार पडणार आहे. अजित पवारांच्या कामाचा मी आधीपासून फॅन आहे. त्यात त्यांची सत्ता देखील आहे. त्यामुळे विकासाचे मार्ग मोकळे आहेत, असं म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला राम राम ठोकत अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या परिसराचा विकास हाच माझा अजेंडा असल्याचं महादेव बाबर यांनी म्हटलं आहे आणि शिवाय येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मी चांगलं काम करून दाखवेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट न मिळाल्यामुळे नाराज
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट न मिळाल्यामुळे महादेव बाबर हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर महादेव बाबर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. पण अखेर महादवे बाबर यांचा राजकीय पक्ष ठरला आहे. ते आज अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. या अनुषगांने राजकीय वातावरणात मोठे फेरबदल होत असल्याचं देखील दिसून येत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार टप्प्यांमध्ये होणार आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मतदानाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आता निवडणूक आयोग तयारी करत आहे. राज्यात आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या वर्षात महापालिका निवडणुका होणार असून, सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाला महायुतीतील पक्षांनी मोठा धक्का दिला असून शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोठ्या प्रमाणावर शिंदे गट आणि भाजपात प्रवेश करत आहेत. या राजकीय स्थलांतराची लाट पुण्यापर्यंत पोहोचली असून, आता महादेव बाबर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महादेव बाबर हे पूर्वी शिवसेनेत होते, मात्र सध्या पक्षांतर्गत वाद आणि राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी नवीन वाट निवडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. महादेव बाबर यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागातील ताकद वाढण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक पातळीवरही याचा थेट परिणाम निवडणूक गणितांवर होणार आहे.