Shahaji Bapu Patil On Vidhan Parishad : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या एका नव्या वक्तव्याची चर्चा होत आहे. त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याकडे इशारा करत म्हटलं की, सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांना आमदार करा आणि मला तुमच्यासारखं विधान परिषदेवर पाठवा. शहाजीबापूंच्या या अजब मागणीनंतर तालुक्यात वेगवेगळी चर्चा सुरु आहे.  


गुरसाळे येथे पार पडलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळीपूजन प्रसंगी ते बोलत होते. 'काय झाडी, काय डोंगर या डायलॉगमुळे राज्यत चर्चेत आलेल्या आमदार शहाजी पाटील यांनी विधानसभा निवडणूक रणांगणातून काढता पाय घेतला काय? अशी टीका विरोधकांकडून केली‌ जाऊ लागली आहे.


शहाजी पाटील पुढं म्हणाले की, पंढरपूरमधून परिचारक आहेत, मंगळवेढ्यातून समाधान अवताडे तर माढ्यामधून बबन दादा म्हणताहेत माझं पोरग पाठवतो. आपलं झाडी डोंगर असं फेमस झालंय की आपल्याला काय नांदेडमध्ये गेलं की गर्दी, कोकणात गेलं तरी गर्दी. त्यामुळे मला तुमच्यासारखं विधानपरिषदे वर घ्या आणि अभिजितला सांगोल्यात उमेदवारी द्या, अशी मागणी भर सभेत आमदार पाटील यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.


'काय झाडी, काय डोंगार'फेम शिंदे गटात गेलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी आपल्याला चक्क विधान परिषदेवर पाठविण्याची मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे. आमदार पाटील यांच्या मागणीनंतर शिंदे गटात आणि सांगोला मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.


सांगोल्याचे दिवगंत शेकापचे नेते कै.भाई गणपतराव देशमुख यांच्याकडून सतत पराभव स्वीकारणारे शहाजी पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करुन अवघ्या काही मतांच्या फरकाने सांगोल्यातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत. पुढच्या निवडणुकीत शेकापचे आव्हान मोठे राहणार याची जाणीव झाल्यानेच आमदार शहाजी पाटील यांनी आता विधानसभेऐवजी विधान परिषदेवर पाठवण्याची विनंती भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे काय अशी चर्चा मतदार संघात सुरु झाली आहे.


हे देखील नक्की वाचा - Shahaji Patil : उजनीच्या उपकालव्यात पाणी सोडण्यासाठी बापूंनी फोनवर घेतली अधिकाऱ्याची शाळा, सोशल मीडियावर क्लिप व्हायरल