राज्यात सातव्या वेतन आयोगाला गणेशोत्सवाचा मुहूर्त
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2018 08:43 AM (IST)
गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत राज्य सरकार सातव्या वेतन आयोगाची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रात सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या घोषणेला अखेर मुहूर्त लाभला आहे. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत राज्य सरकार सातव्या वेतन आयोगाची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. एक जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू होत आहे. त्यामुळे यामधील थकबाकीचा सुमारे पाच हजार कोटींचा पहिला टप्पा गणेशोत्सवाच्या काळात थेट कर्मचाऱ्यांच्या पगारात जमा होणार आहे. कोणाला किती थकबाकी? प्रथम श्रेणी कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपये द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांना 75 हजार तृयीय श्रेणी कर्मचाऱ्यांना 50 हजार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा वाढता दबाव लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिवाळीपासून प्रत्यक्षात सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. म्हणजेच दिवाळीच्या महिन्यापासून प्रत्यक्ष वाढीव पगार हा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करताना आधीच खडखडाट असलेल्या राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे 21 हजार कोटींचा भार पडणार आहे.