मुंबई : राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आज अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. अनुदानित, अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करण्याबाबतचा शासन निर्णय हा आज प्रसिध्द झाला आहे.


शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत असताना, शिक्षकांनाही त्याचवेळी हा वेतन आयोग लागू होत आहे. सातवा वेतन आयोग शासकीय कर्मचाऱ्यांच्याबरेाबर लागू होण्याची, अशी ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी पाचवा आणि सहावा वेतन आयोग शिक्षकांना उशिरा लागू झाला होता.


या शासन निर्णयामुळे राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये आणि सैनिकी शाळांतील पूर्णवेळ शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे.


आज प्रसिध्द झालेल्या शासन निर्णयामुळे अन्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीची अधिसूचना 30 जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध केली आहे.


व्हिडीओ -