NCP Second List : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याठिकाणी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीमध्ये दोन उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे, सातारा जागेवरील पेच सुटला नसल्याचे स्पष्ट झालं आहे. सातारमध्ये आतापर्यंत एकही उमेदवार महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. दरम्यान, बीडमध्ये ज्योती मेटे यांच्या उमेदवारीच चर्चा सुरू होती. मात्र, या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे. बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता त्यांचा सामना पंकजा मुंडे यांच्याशी होईल. बजरंग सोनवणे यांनी गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत काम केले असून त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसला आहे.
भिवंडी जागा शरद पवार गटाकडे
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये भिवंडीच्या जागेवरून मोठे मतभेद निर्माण झाले होते. मात्र आता ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अपेक्षेनुसार यापूर्वी पहिल्या यादीत शिरूरमधून अमोल कोल्हे, बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि नगर दक्षिणमधून निलेश लंके रिंगणात असणार आहेत. वर्धामधून कराळे गुरुजी प्रचंड आग्रही असताना अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या