जळगाव : ज्या माणसानं महाराष्ट्राला अजरामर कविता दिल्या, ज्या माणसानं माणसाला निसर्गावर प्रेम करायला शिकवलं, त्याच माणसाला आज आपलं घर सोडावं लागलं आहे. घरासमोरच्या रिकाम्या भूखंडावरचा कचरा न हटवल्यानं उद्विग्न झालेल्या रानकवी ना. धों. महानोर यांनी जळगावमधल्या आपल्या राहत्या घराला टाळं लावून, भाड्याच्या खोलीमध्ये आसरा घेतला आहे.


वारंवार तक्रारी करुनही प्रशासनानं दखल घेतली नाही. त्यामुळे महानोर यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही, तर दुसरीकडे पळसखेडमधल्या शेतातल्या घरातली वीजही गेल्या 5 दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे महानोर यांनी आता भाड्याच्या घरात आसरा घेतला आहे.

जळगाव शहरातील खुल्या भूखंडांवरील अस्वच्छता हा गंभीर प्रश्न बनला आहे. अशा भूखंडाच्या अस्वच्छतेमुळे शहरात दुर्गंधी आणि चिकनगुन्या,डेंग्यू, मलेरिया यांसारखे विविध आजार पसरले आहेत. याचाच फटका जेष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांना देखील बसला आहे.

ना. धों. महानोर यांचं घर जळगाव शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या आदर्श नगर परिसरात आहे. निसर्गकवी असल्याने त्यांनी आपल्या घराचे नाव देखील ‘पानकळा’ असे ठेवले आहे. मात्र त्यांच्या घरासमोरच असलेल्या भूखंडावर परिसरातील नागरिक घाण आणि कचरा आणून टाकत असल्याने त्याची दुर्गंधी आणि कचरा यांमुळे त्यांच्या घराला अवकळा निर्माण झाल्या आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून विविध तक्रारी करुनसुद्धा तात्पुरता फरक सोडला तर स्वच्छतेच्या बाबतीत पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी वेळ त्यांच्यावर आल्याने त्यांनी आपल्या स्वतःच्या घराला टाळे ठोकून दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहायला जाणे पसंत केले आहे. त्यांच्या या निर्णयाने जळगाव शहरातील स्वच्छता मोहिमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार आहे. या काळात कधी झाली नसेल अशी स्वछता मोहीम त्यांनी राबवून स्वच्छतेच्या बाबतीत जनतेच्या मनात चांगले स्थान निर्माण केले आहे.

महानोरांची समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या घरासमोर कचरा टाकणाऱ्या काही जणांवर त्यांनी कारवाई करीत नोटीस देखील बजावली होती. मात्र त्याचाही म्हणावा तसा परिणाम न झाल्याने महानोर यांनी या समस्येतून आपली सुटका नाही या हतबलतेतून आपले घरच बदलणे पसंत केले.