Bhaskar Chandanshiv passes away: अवघं आभाळ फाटल्याने कधीही न पाहिलेल्या महापुराने अवघ्या मराठवाड्याचा 'लाल चिखल' झाला असतानाच  शाळेच्या धड्यातून काळीज चिरणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे आज (28 सप्टेंबर) यांचे निधन झाले. टोमॅटोचा दर मातीमोल झाल्याने शेतकरी हताश होऊन पायाखाली पिकवलेल्या टोमॅटोचा जेव्हा लाल चिखल करतो तेव्हा काय होतं हे आपल्या प्रत्यक्ष ग्रामीण लेखणीतून टिपणारे भास्कर चंदनशिव मुळचे धाराशिव जिल्ह्यातील. आज तोच जिल्हा दुर्दैवाने महापुरात नेस्तनाबूत झाला आहे. अवघी शेती खरडून गेली आहे. याच मातीतील अवलिया आज काळाच्या पडद्याआड गेला. भास्कर चंदनशिव यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी कमलाबाई, मुलगा कपिल, मुलगी मनिषा, दोन सुना, नाती, नातू, जावई, व मोठा परिवार आहे. 

Continues below advertisement

भास्कर चंदनशिव यांचा जन्म 12 जानेवारी 1945 रोजी हासेगाव (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथे जन्म झाला. त्यांचे मुळ नाव भास्कर देवराव यादव होते. दत्तक झाल्यानंतर ते भास्कर तात्याबा चंदनशिव म्हणून त्यांची ओळख झाली. शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा कळंबमध्ये झाले. अंबाजोगाईत बीए पूर्ण केलं. छत्रपती संभाजीनगरला मराठी विषयातून एम.ए केले. जून 1972 मध्ये वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरीस प्रारंभ केला. त्यांनी वैजापूर येथे नोकरी केली. बलभीम महाविद्यालय बीड येथून 2005 मध्ये ते सेवानिवृत्त झाल्यानंतर कळंबला स्थायिक झाले.

वयाच्या विसाव्या वर्षीपासून लेखणी 

वयाच्या विसाव्या वर्षी भास्कर चंदनशिव यांनी कथालेखनास प्रारंभ केला. तत्पूर्वी मराठवाडयाच्या काळजावर सातत्याने कोरला गेलेला दुष्काळ हा त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला. त्यांच्या साहित्यकृतीमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारुळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो. भास्कर चंदनशिव हे मराठवाडा साहित्य परिषदेच्या 2011 सालच्या एप्रिलमध्ये केज (जि. बीड) येथे झालेल्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. 2012 मध्ये रोजी पळसप (जि. औरंगाबाद) येथे झालेल्या एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते.

Continues below advertisement

भास्कर चंदनशीव यांची साहित्यसंपदा

कथासंग्रह : 

  • जांभळढव्ह (1980), 
  • मरणकळा (1983), 
  • अंगारमाती (1991), 
  • नवी वारुळ (1992), 
  • बिरडं (199)  
  • ललितलेख संग्रह : रानसई 
  • समीक्षा ग्रंथ : भूमी आणि भूमिका, माती आणि नाती, माती आणि मंथन 
  • संपादन : ज्योती म्हणे, गाथा, सगनभाऊंच्या लावण्या इत्यादी.

इतर महत्वाच्या बातम्या