मुंबई : नवाकाळ या दैनिकाचे संपादक आणि अग्रलेखांचा बादशहा अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85व्या वर्षी मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे ते जवळपास 27 वर्षे संपादक होते. खाडिलकर यांच्यावक दुपारी 3 वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याअगोदर अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव नवाकाळ दैनिकाच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.


दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे जवळपास 27 वर्षे संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. ते 'संध्याकाळ' या नावाचे सायंदैनिकही काढीत असत. निळूभाऊ खाडिलकरांचे  'हिंदुत्व' हे पुस्तक समीक्षकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.

खाडिलकर यांच्या झंझावाती, मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला होता. त्यामुळेच त्यांना अग्रलेखांचा बादशहा अशी ओळख मिळाली. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकारही होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरूजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती गाजल्या होत्या. तळागाळातील लोकांसाठी नीळकंठ खाडिलकर यांनी आपली लेखणी वापरली. एकहाती लेखणी चालवून अग्रलेखांच्या जोरावर खाडिलकर यांनी नवाकाळ या दैनिकाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

नीलकंठ खाडिलकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

महाराष्ट्र सरकारचा पत्रकारितेचा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार(2008)
मुंबई मराठी पत्रकार संघाचे दोनदा अध्यक्षपद
भारत सरकारकडून पद्मश्री
‘चौफेर’ कऱ्हाडतर्फे ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार (2011)
मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे पुरस्कार
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (2017)