अहमदनगर : कोपर्डीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींना तातडीने येरवडा कारागृहात हलवा, अशी मागणी
निनावी फोनद्वारे एका तोतयाने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आपण मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचे खाजगी पीए कुलकर्णी बोलत आहे. अर्ध्या तासात कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना पुण्यातील येरवडा तुरुंगात हलवा, अशी मागणी अज्ञात व्यक्तीने फोनवरुन केली. त्याचबरोबर तुमच्या कर्मचाऱ्यांना घरी सोडू नका, असंही त्याने बजावलं.

या फोनमुळे अहमदनगरच्या कारागृहात एकच खळबळ उडाली. मात्र खातरजमा केल्यावर हा फोन तोतया इसमाने केल्याचं लक्षात आलं.

पहिल्यांदा सबंधिताला नाव विचारल्यावर त्यानं फोन ठेऊन दिला. पुन्हा पाच मिनिटांनी डीसीपी बोलतोय असं सांगत आरोपी आता कोर्टातून निघाले असून त्यांना अजिबात न थांबवता येरवडा जेलला पाठवा, असं सांगून फोन ठेऊन दिला.

त्यानंतर पुन्हा काही वेळानं फोनवर मी अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर भूषणकुमार उपाध्ये असल्याचं सांगितलं. कोपर्डीचे आरोपी लगेच वर्ग करा, आरोपी येरवडाला सुरक्षित राहतील. नागपूरला पाठवू नका, असं बजावलं.

या प्रकरणी कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.  खोटी नावं सांगत तोतयागिरी करुन कारागृह प्रशासनाच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याची फिर्याद दिलीय. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.