औरंगाबाद : आयपीएलच्या सट्ट्यात हरलेले तब्बल दीड कोटी रुपये फेडण्यासाठी चोरी करणाऱ्या खिडकी गँगला औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खिडकी तोडून चोऱ्या केल्याने ही टोळी अहमदनगर, औरंगाबाद आणि जालन्यात खिडकी गँग म्हणून ओळखली जाते.


गेल्या काही महिन्यात या टोळीने शहरात सहा घरफोड्या केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी खिडकी गँगमधील बीडच्या सय्यद सिकंदर सय्यद अख्तर आणि नगरच्या सय्यद सिराज सय्यद लियाकत,  शेख बबलू शेख रहेमान यांना औरंगाबादेत चोरीच्या तयारीत असताना बेड्या ठोकल्या.

या गँगचा म्होरक्या असलेल्या सय्यद सिकंदर सय्यद अख्तरला क्रिकेटमध्ये सट्टा लावण्याचा छंद आहे. त्याने गेल्या मोसमात लोकांकडून ऊसनवारी करून थोडे थिडके नाही तर तब्बल दीड कोटींचा सट्टा लावला आणि हरला. त्यानंतर त्याने नगर-औरंगाबादच्या भामट्यांना एकत्र करून ही गँग बनवली आणि कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न सुरु केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घरफोडी करण्यासाठी या टोळीने खास अवजारे बनवली होती. खिडकीचा खिळा काढण्यासाठी जेवढा प्रकाश लागतो तेवढाच प्रकाश देणारी बॅटरी, अनकुचीदार टॉमीदेखील तयार करून घेतली होती. पोलिसांनी या गँगकडून खिडकी तोडण्यासाठीच्या साहित्यासह काही रोकड आणि एक कार हस्तगत केली आहे.

या टोळीने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातूर येथील बंगल्यातही चोरी केल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे दिवसेंदिवस पोलिसांची डोकेदुखी ठरत असलेल्या या गँगला बेड्या ठोकण्यास औरंगाबाद पोलिसांना यश आलं आहे.