मुंबई: शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी घेण्यात आलेला सेल्फीचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी यासंदर्भात ही माहिती दिली आहे.

मुलांच्या वर्गातील उपस्थितीसाठी शिक्षकांना वर्गात विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याची सक्ती सरकारनं केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी या उपक्रमाला विरोध झाल्यानं हा निर्णय तूर्तास स्थगित केला गेला आहे.

पटपडताळणीसाठी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र शिक्षक संघटेनने विरोध केला होता. सेल्फीच्या निर्णयामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार नसून उलट यामुळे शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त भार पडेल, असा दावा शिक्षक संघटेनेने केला होता.

सेल्फीच्या मोहाने गैरहजर असणारे 18 टक्के विध्यार्थी शाळेकडे आकर्षित होतील, या आशेने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला होता.