उस्मानाबाद: तुळजाभवानीच्या दरबारातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं दुसरं पर्व सुरु झालं. मराठा समाजानं शांततेच्या मार्गानं 58 विक्रमी मोर्चे काढले पण आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे आता आंदोलनाचं दुसरं पर्व सुरु करण्यात येत असल्याचं आयोजकांनी सांगितलं.

त्यासाठी आज तुळजापुरात एक रॅली काढण्यात आली. भवानी रोडवरील महाद्वारासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण द्यावं, शेतमालला भाव द्या, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करा, कोपर्डी बलात्कार पीडितेला न्याय द्या, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

हायकोर्टाचे सरकारला आदेश

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आयोगानं कामाची गती वाढवावी असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. 31 जुलैपर्यंत माहिती गोळा करण्याचं काम पूर्ण करणार अशी ग्वाही त्यावर राज्य सरकरनं हायकोर्टाला दिली.

वर्षभर प्रलंबित असलेल्या मुद्यावर आणखी किती वेळ लागणार? असा सवाल हायकोर्टानं विचारला होता. याप्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑगस्टला होणार आहे.

आधीच हे प्रकरण गेल्या दीड वर्षांपासून आयोगाकडे पडून आहे, आणखी किती वेळ देणार? असा सवाल हायकोर्टानं केला.

मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा, जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशी मागणी करणारी याचिका विनोद पाटील यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.



संबंधित बातम्या 

मराठा आरक्षणाबाबत आयोगाने कामाची गती वाढवावी : हायकोर्ट