लोकमंगलची खाती गोठवण्याची नोटीस, सुभाष देशमुखांच्या अडचणीत वाढ
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2019 05:12 PM (IST)
सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत वाढ होणार आहे.
मुंबई : सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत वाढ होणार आहे. कारण सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगलची सर्व खाती गोठवण्याची सेबीने नोटीस जारी केली आहे. लोकमंगलचे डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडाची खाती गोठवण्यासाठी सेबीने ही नोटीस बजावली आहे. गुंतवणुकदारांचे 75 कोटी रुपये परत करण्याचे सेबीने आदेश दिले होते, पण लोकमंगलने या आदेशांचं पालन केलं नाही. 16 मे 2018 रोजी गुंतवणूकदारांचे 75 कोटी रुपये 3 महिन्यात परत करण्याचे सेबीने आदेश दिले होते. मात्र मागील सहा महिने लोकमंगलने सेबीच्या आदेशाला उत्तरच दिलं नाही. त्यामुळे सेबीने लोकमंगलची खाती गोठवण्यासाठी नोटीस जारी केली. लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबरोबरच, नोटीसमध्ये देशमुख यांच्या पत्नी स्मिता देशमुख, वैजनाथ लातूरे, औदुंबर देशमुख, शहाजी पवार, गुर्राना तेली, महेश देशमुख, पराग पाटील यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.