मुंबई: राज्यातील राजकारणासाठी पुढचे दोन दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. बुधवारी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपाची (Lok Sabha Election) चर्चा होणार असून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपवारही शिक्कामोर्तब होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये वंचितला (VBA) किती जागा द्यायच्या यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. 


वंचितला किती जागा द्यायच्या हे ठरणार


महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये सिल्व्हर ओकवर खलबतं झाली असून जागावाटपासंदर्भात बुधवारी 6 मार्चला अंतिम बैठक होणार आहे. शरद पवारांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे. 


महाविकास आघाडीच्या होणाऱ्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला किती जागा आणि कोणत्या जागा द्यायच्या आणि इतर पक्षांनी कोणत्या जागा लढवायच्या यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णयही घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीत नेमके कोणत्या विषयावर चर्चा झाली?


- मविआच्या बैठकीत नेमके काय काय मुद्दे असतील या संदर्भात चर्चा करण्यात आली.
- वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत घ्यायचं आहे, मात्र त्यांना नेमक्या कोणत्या जागा महाविकास आघाडीतून द्यायच्या या संदर्भात चर्चा झाली.
- दोन-तीन जागा संदर्भात महाविकास आघाडीमध्ये तो तिढा होता त्या संदर्भात अंतिम चर्चा झाली
- सर्व 48 जागांचे वाटप लवकरात लवकर करणे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचार सभांचे नियोजन यावर विस्तृत चर्चा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये झाली. 


महायुतीच्या जागावाटपावरही शिक्कामोर्तब होणार


केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर राज्यातील महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. तसेच अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने त्यांची 27 जागांवर लढण्याची तयारी असल्याचं महाविकास आघाडीला सांगितलं होतं. त्यामुळे वंचितला आता किती जागा दिल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


ही बातमी वाचा: