शिल्पकाराचा खजिना आगीत भस्मसात, प्रमोद कांबळेंना मानसिक धक्का
एबीपी माझा वेब टीम | 01 Apr 2018 05:29 PM (IST)
संग्रहालयात असलेलं फायबर आणि थिनर यामुळे ही आग भडकली. कांबळे यांच्या स्टुडिओच्या परिसरात असलेला कचरा पेटवल्यानं ही आग भडकल्याचं सांगितलं जात आहे.
अहमदनगर : प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ आगीत भस्मसात झाल्यानं कांबळे यांना जोरदार मानसिक धक्का बसला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दुपारी अचानक कांबळे यांच्या कार्यालयाला भीषण आग लागली. त्यात संपूर्ण कार्यालय भक्ष्यस्थानी पडलं आहे. आगीत कांबळे यांना मिळालेले प्रमाणपत्र, बक्षीसं, विविध पुरस्कार जळून खाक झाले आहेत. त्याचबरोबर कांबळे यांचं शिल्प आणि पुस्तकांचं संग्रहालयही आगीत पूर्ण जळालं आहे. संग्रहालयात असलेलं फायबर आणि थिनर यामुळे ही आग भडकली. कांबळे यांच्या स्टुडिओच्या परिसरात असलेला कचरा पेटवल्यानं ही आग भडकल्याचं सांगितलं जात आहे. आग लागल्यानंतर दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र केमिकल आणि कलर स्टुडिओत असल्याने काही ठिकाणी आग अद्यापही धुमसत आहे. दरम्यान, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.