कोल्हापूर : खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं. बिंदूनामावलीतील त्रुटी दूर करण्याचं लेखी आश्वासन जिल्हा प्रशासनाने महासंघाला दिलं. यासाठी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन सुरु केलं होतं.


शिष्टमंडळाने प्रशासनासोबत प्रदीर्घ चर्चा करून बिंदूनामावलीतील त्रूटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. प्रशासनाने मागण्या मान्य केल्या, पण जोपर्यंत लेखी पत्र दिलं जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन माघार घेतलं जाणार नाही, अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली. अखेर प्रशासनाने या प्रकरणाची पंधरा दिवसात चौकशी करण्याचं लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

बिंदू नामावली तयार करताना निवड याद्या, निवड प्रवर्ग नसणं, पुरावे गहाळ अशा त्रुटी आहेत. शिवाय आरक्षित बांधवांची आरक्षित प्रवर्गामध्ये निवड होऊनही, त्यांची नोंद खुल्या प्रवर्गात करण्यात आली आहे, असा आरोप शिक्षकांच्या खुल्या प्रवर्ग महासंघाने केला आहे.

शिक्षकांचा आक्षेप आणि मागण्या काय?

निवड प्रवर्ग मागास असूनही रोष्टरमध्ये अनेक मागासवर्ग बांधव खुल्या प्रवर्गात दर्शविले आहेत

निवड याद्या उपलब्ध नाहीत, पुरावे गहाळ

अनेक शिक्षकांची नियुक्ती कोणत्या प्रवर्गात झाली याची नोंद नाही

वस्तीशाळा शिक्षकांचे बिंदू निश्चितीकरणादरम्यान शासन निर्णयाकडे कानाडोळा