Weather Update: उन्हाने अंगाची लाही लाही, मराठवाड्यात सुर्य आग ओकतोय; दक्षिण पूर्व भागात वादळीवारे, तापमानाचा अंदाज काय?

पुढील तीन दिवसात मराठवाड्याच्या दक्षिण- पूर्व भागात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Continues below advertisement

Weather Update: राज्यात सध्या तापमानाचा प्रचंड उच्चांक होत असताना सध्या मराठवाडा चांगलाच तापलाय. कमाल तापमानाचा पारा भयंकर वाढला असून उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झालेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 40.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर 40.7 अंश सेल्सियस परभणीत नोंदवले गेले. लातूर आणि धाराशिवमध्ये 39 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसात मराठवाड्याच्या कमाल तापमानात प्रचंड वाढ होणार असून किमान तापमानही 2-3 अंशांनी वाढ होणार आहे. (Weather Forecast)

Continues below advertisement

हवामान विभागाचा अंदाज काय?

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसात मराठवाड्याच्या दक्षिण- पूर्व भागात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 08 व 09 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी रात्र उबदार राहील. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही.हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, नांदेड, लातूर तसेच धाराशिव जिल्ह्यात हलक्या पावसचा इशारा देण्यात आला आहे.वाढत्या तापमानामूळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे. असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे.

शेतकऱ्यांनी करा पिकांचं नियोजन

मळणी केलेल्या रब्बी ज्वारी व गहू पिकाच्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या हळद पिकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तुडतुडे, फुलकीडे व पांढरी माशी) कीडींना आकर्षीत करण्यासाठी एकरी 10 ते 12 पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे व लाल केसाळ अळीचे समूहातील अंडी लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंचा ॲझाडिरेक्टिन (30 पीपीएम) 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागांचे नियोजन  कसे कराल?

घड लागलेल्या  केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. केळी बागेस आवश्यकतेनूसार सरी वरंब्याने पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. आंबा बागेत जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्‍यावी. द्राक्ष बागेतील माती मोक्ळी करून खत व्यवस्थापन करावे.

हेही वाचा:

प्रकल्पात पाणी असूनही औसेकरांचा घसा कोरडा, नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळं पाणीटंचाई

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola