नंदुरबारमध्ये पाणी वाटपावरुन हाणामारी, MIM च्या नगरसेवकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2017 08:58 AM (IST)
नंदुरबार : शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत पाणी वाटपावरुन दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत पालिकेचे बांधकाम सभापती असलेले नगरसेवक सद्दाम तेली यांचा मृत्यू झाला. शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत गेल्या काही दिवसापासून पाणी टंचाईची समस्या होती. त्यामुळे या भागात नगरपालिकेच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. यावेळी पाणी वाटपावरुन माजी नगरसेवक शेख मेहमूद शेख त्यांचे समर्थक व नगर पालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली, नगरसेविका पुत्र सैय्यद मुजफर अली, सैय्यद नासिर अली यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत गुप्ती व तलवारीचा खुलेआम वापर करण्यात आला. यात पाच जण जखमी झाले आहेत. यातील जखमी झालेले पालिकेचे बांधकाम सभापती असलेले नगरसेवक सद्दाम तेली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर सद्दाम तेली यांच्या समर्थकांनी गरीब नवाज कॉलनी परिसरात धुमाकूळ घालत दगडफेक आणि जाळपोळ केली. यात जमावाने पोलिसांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. मात्र, पोलिसांचा अधिकचा फौजफाटा आल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण आलं. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.