Latur News : कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील अंगणवाडीसह पहिली ते चौथीच्या जिल्हा परिषद, खाजगी शाळा बंद होत्या. आता कोविडचा प्रभाव ओसरत असल्याने आजपासून अंगणवाडीसह पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी असल्याने तसेच पालक आणि शालेय व्यवस्थापन समित्यांनीही त्यासाठी विरोध न केल्याने सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याचे नक्की झाले.


विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्राद्वारे कळविले


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर (corona third wave) सरकारने पाचवी ते 12 वीपर्यंतच्या शाळा नियमांचे काटेकोर पालन करून सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, पहिली ते चौथीच्या शाळांना परवानगी नव्हती. आता रितसर परवानगी मिळाल्याने लातूर जिल्ह्यातील अंगणवाडीसह पहिली ते चौथीच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षणाधिकारी (प्रा.) भगवान फुलारी यांनी पूर्ण तयारी करून जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्राद्वारे कळविले आहे.


मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूरसह मोठ्या शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात


महाराष्ट्राचा विचार केला तर तिथेही रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूरसह मोठ्या शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. काही जिल्ह्यात रविवारी एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1 हजार 437 नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राज्यात एक हजार 635 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरली आहे. कारण मुंबई, पुणे जिल्हा, पुणे मनपा आणि अहमदनगर वगळता कोणत्याही जिल्ह्यात तीन आकडी रुग्णसंख्या नाही. 


कोरोना रुग्णांच्या संख्येत घट


दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. देशातील कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या 24 तासात देशात 16 हजार 51 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 206 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या दिवसाच्या तुलनेत आजची रुग्णसंख्या ही कमी आहे. काल देशभरात 19 हजार 968 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, गेल्या 24 तासात देशात 37 हजार 901 कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 38 हजार 524 लोकांना लागण झाली आहे. त्यापैकी 5 लाख 12 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 21 लाख 24 हजार लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सद्या देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांपेक्षा कमी आहे. सध्या एकूण 2 लाख 2 हजार 131 रुग्णांवर उपचार सुरूच आहेत.


 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha